Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काय आहे दमा वर प्रतिबंधात्मक उपाय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डॉ. अशोक अरबट

ज्येष्ठ श्‍वसनरोग तज्ज्ञ, नागपूर

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विकसित देशांच्या तुलनेत आपल्याकडे दम्याचे प्रमाण होण्याचे एक प्रमुख कारण हे प्रदुषण आहे. शिवाय आपल्याकडे तरुणांच्या तुलनेत लहानग्यांमध्येही दम्याचे प्रमाण जास्त आहे; विशेषतः महानगरांमध्ये…! अशा वेळी दम्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे.

सर्वप्रथम आपण दम्याच्या प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देऊया. कारण ‘प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर…’ म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणे हे उपचार करवून घेण्यापेक्षा कधीही चांगले असते. शिवाय दमा फार वाढला, तर औषध घेऊ अथवा त्यावेळी काळजी घेऊ असे म्हणत दम्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजले नाही तर दमा पुढे शरीरात कायमस्वरुपी रुजतो व जीवघेणा देखील ठरू शकतो. त्यामुळे पुढे सांगितलेल्या गोष्टींचे दम्याच्या रुग्णांनी पालन करणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी सर्वप्रथम ज्या गोष्टींमुळे दमा वाढू शकतो, त्या गोष्टींपासून दुर राहणे अत्यावश्यक आहे. दमाग्रस्त व्यक्तीने सर्वप्रथम कुठल्याही प्रकारच्या धुळापासून व धुरापासून अगदी अगरबत्तीच्या धुरापासूनही दुर राहणे गरजेचे आहे. याशिवाय दमाग्रस्त व्यक्तीने तंबाखुचे सेवन व धुम्रपान प्रकर्षाने टाळले पाहिजे. धुम्रपान हे दमा वाढविण्यासाठी ट्रिगरचे कार्य करू शकते.

अलिकडल्या काळात प्रदुषण वाढले आहे. (अर्थात कोव्हिड-19 लॉकडाऊनमुळे तात्पुरते ते कमी देखील झाले आहे) या प्रदुषणाचा दम्याचा आजार असलेल्या रुग्णांवर प्रभाव पडत असतो. किंबहुना प्रदुषण ज्यांना दम्याचा आजार आहे, त्यांचा आजार तीव्र करण्यासाठी  अलिकडल्या काळातील एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अतिप्रदुषण असलेल्या जागी जाण्याचे टाळले पाहिजे.

घरातील केर काढताना देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. दमा असेल तर घरातील केर काढण्याचे टाळावे. कारण त्यामध्ये असलेले कण देखील दम्याच्या विकारांसाठी कारणीभूत ठरू शकतात. ही धुळ फार अ‍ॅलर्जिक असते, असे आढळून आले आहे. घरात अडगळीत पडलेले सामान, जुन्या पुस्तकांमधील धुळ आणि जुन्या कपड्यांना चिपकलेली धुळ देखील दम्याच्या विकारांमध्ये ट्रिगर म्हणून कार्य करतात. त्यामुळे़ दम्याचा विकार असलेल्यांनी शक्यतो हे हाताळण्याचे टाळावे. फार गर्दी असलेल्या ठिकाणी गेल्याने देखील दम वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो दाटीवाटीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मोकळ्या वातावरणात रहावे. सतत व्हायरल इंफेक्शन होत असल्याने देखील दम वाढू शकतो. जसे आपण गेल्या भागात बघितले की, त्याचा आपल्यावर किती काळ आणि किती प्रमाणात प्रभाव पडला आहे, त्यामुळे पुढील बाब अवलंबुन आहे. मात्र, जेवढ स्वस्थ राहता येईल, तेवढे चांगले. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे देखील गरजेचे आहे. आता ‘ओव्हर एक्जरशन’ म्हणजे शरीराच्या क्षमतेहून अधिक कार्य केल्याने देखील दम वाढू शकतो. शिवाय ताणतणाव देखील दम्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ताणतणाव रहित आयुष्य कसे जगता येईल, यासाठी जीवनशैली संतुलित करण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे दमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. नियमित व्यायाम करीत वर सांगितलेल्या बाबींचे पालन केले तर दमासारख्या आजारात सामान्य जीवन जगता येणे शक्य आहे.

लहान मुलांमधील दमा

जाता जाता एका बाबीकडे आपले लक्ष वेधायचे आहे. आपल्याकडे लहान मुलांमध्ये लक्षणीय प्रमाणात दम्याचा आजार आढळून येतो. लहान मुलांना दम्याचा त्रास असेल तर कसा ओळखाल? त्यांना अन्य मुलांच्या तुलनेत अधिक दम तर लागत नाही; याकडे लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे पालकांना अथवा घरात कुणाला दम्याचा त्रास असेल तर आवर्जुन लक्ष द्यावे. बाळाच्या जन्माच्या वेळी वजन कमी असेल तरी देखील पुढे त्यास दम्याची लक्षणे आढळून येतात का, याकडे लक्ष दिले पाहिजे.  शिवाय नियमित सर्दी-खोकल्यासाठी दमा कारणीभूत ठरू शकतो. लहानगे फार रडत असतील, अन्य मुलांच्या तुलनेत कमी अ‍ॅक्टिव्ह असतील, फार हट्टी होत असतील वा चिडचिड करत असतील तर किंबहुना दम्याचा त्रास असू शकतो.

Comments are closed.