गोंडवाना विद्यापीठात संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, रासेयो अधिकारी व ग्रंथपालांची सहविचार सभा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १५ : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील शैक्षणिक समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), NAAC मूल्यांकन आणि नव्या शैक्षणिक उपक्रमांवर विचारमंथन करण्यासाठी विद्यापीठात प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि ग्रंथपाल यांची सहविचार सभा पार पडली. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाविद्यालये व विद्यापीठ यांच्यातील कार्यप्रणाली अधिक सुकर करण्यावर भर देण्यात आला.
सभेला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे तसेच राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य समयजी बंसोड आदींची उपस्थिती लाभली. संलग्निकरण, कॅस प्रक्रिया, प्राचार्य-शिक्षक भरती, विद्यार्थी प्रवेश, ई-समर्थ प्रणाली आणि NEP अंमलबजावणी यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत नागपूर पुस्तक महोत्सव–२०२५ संदर्भात समयजी बंसोड यांनी मार्गदर्शन करताना वाचनसंस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात लेखक, कवी, प्रकाशक, वाचक यांच्यात थेट संवाद साधता येतो आणि विविध भाषांतील साहित्य एका व्यासपीठावर उपलब्ध होते, असे ते म्हणाले. समाजात वाचनाची सवय वृद्धिंगत व्हावी म्हणून ‘एक दिवस पुस्तकासाठी’ देण्याचे आवाहन त्यांनी सभागृहातील उपस्थितांना केले. गोंडवाना विद्यापीठ ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून या महोत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक धोरणांबाबत प्र-कुलगुरू डॉ. कावळे यांनी माहिती देत सर्व महाविद्यालयांनी NEP आणि NAAC च्या निकषांनुसार आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली. विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, गुणवत्तावृद्धी आणि विद्यार्थी-केंद्रित पद्धतीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. रजनी वाढई यांनी सुत्रसंचालन करत आभार मानले. सभेला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वाची बैठक ठरलेल्या या सहविचार सभेतून विद्यापीठ–महाविद्यालय संबंध अधिक मजबूत होण्याबरोबरच गुणवत्ता, जबाबदारी आणि शैक्षणिक दिशादर्शकतेला नवा वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

