अखेर चक्रीवादळ, गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ५ मे : तालुक्यात १ में रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान चक्रीवादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांनी भेट दिली. तर या सोबतच माजी आ. आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी निवेदनातून मागणी केली होती.

त्याच मागणीच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने दखल घेतली असुन तहसिलदार कल्याणकुमार दहाट यांनी कृषी विभाग व तलाठ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे मोका पंचनामा करण्याचे तात्काळ आदेश दिल्याने दिनांक ४ मे पासून शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यास कृषी सेवक व तलाठी यांनी सुरुवात केली आहे.

यामध्ये पाथरगोटा, पळसगाव, अससोडा, वघाळा, शिवनी, सायगाव, जोगीसाखरा, रामपुर या गावांचा समावेश असून सर्वेक्षण करतेवेळी मोतीलाल लिंगायत, नारायण सरकार, जगन पत्रे, संजय मडावी, ईश्वर ठाकरे, कार्तीक मातेरे, भुमेश्वर राऊत, हरी मातेरे, उचित मातेरे, मच्छिंद्र मेश्राम, यशवंत मातेरे, बाजीराव बगमारे, विलास पेन्दाम, भैयाजी कन्नाके आदि उपस्थित होते.

Anandrao GedamKrushna Gajbhe