लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : आरमोरी येथील बर्डी ते शक्तीनगर या आरमोरी-गडचिरोली राज्यमार्गावरील सहा दुकाने फोडून चोरट्यांनी धुडगूस घातला. सदरची घटना १ डिसेंबरच्या रात्री घडलेली असून ३४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलेला आहे. त्यामुळे आरमोरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आरमोरीतील बर्डी येथील किराणा व्यापारी चंदू वडपल्लीवार यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी काउंटरमध्ये ठेवलेले एकूण १० हजार रुपये शक्तीनगरच्या समोर असलेल्या अनिरुद्ध रमेश निमजे यांच्या मेडिकलचे शटर तोडून १५ हजार रुपये, प्रीतम निमजे यांच्या पॅथॉलॉजी लॅबमधील १ हजार रुपये, वैभव मोटघरे यांचे मोबाइल शॉपीतून ५ हजार ९०० रुपये तसेच वैभव मोटघरे यांच्या मोबाइल शॉपीतून २३०० रुपयांचे साहित्य, भोजराज दहीकर यांच्या फर्निचरच्या दुकानातून ५०० रुपये असा एकूण ३४ हजार ७०० रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिसांनी पंचनामा केला.
आरमारी शहरात चौकात व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, परंतु सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने त्यात हे चोरटे दिसले नाहीत. चोरीचा तपास करण्यासाठी गडचिरोलीवरून ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आलेले होते, परंतु चोरांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रताप लामतुरे, हवालदार विशाल केदार हे तपास करीत आहेत.