मोठी बातमी: गडचिरोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २५ मार्च: गडचिरोली वनविभागात येत असलेल्या गडचिरोली वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचे वास्तव्य असल्यामुळे येथील वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांना नेहमी जंगल गस्ती कराव्या लागते. नेहमीप्रमाणे क्षेत्र सहाय्यक गडचिरोली व त्यांचे अधिनस्त कर्मचारी हे दिनांक २४ मार्च २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता पासून जंगल गस्ती करत असतांना सुमारे १२.३० वाजता क्षेत्र क्रमांक ७६ मध्ये त्यांना ५ संशयित इसम दिसून आले. संशयित इसमांची क्षेत्र सहाय्यक गडचिरोली यांनी तपासणी केली असता त्यांचेकडे भरमार बंदूक व स्फोटक पदार्थ आढळून आले.

सदर इसमांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, गुलसिंग शेरसिंग दुधानी रा. गोकुळनगर, नानुसिंग गुमानसिंग पटवा रा. गोकुळनगर, बालाजी मुकुंदा दळांजे रा. विहिरगाव, पिंकू सुरेश खोब्रागडे रा. चांदाळा व विनोद किसन नरोटे रा. चांदाळा (टोला) अशी संशयित इसमांची नावे उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच सोनल भडके, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) गडचिरोली वनविभाग व डी. व्ही. कैलुके, वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली (प्रादे.) यांनी घटनास्थळावर जाऊन अधिक तपास व विचारपूस केली असता, सदर आरोपी हे जंगलामध्ये जाऊन वन्यप्राण्यांची भरमार बंदूक व बॉम्ब गोळ्यांचा वापर करून शिकार करीत असल्याचे स्पष्ट झाले.

गडचिरोली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १७६ मध्ये ५ ठिकाणी बॉम्ब गोळे जमिनीवर पेरून ठेवल्याचे आरोपींनी प्रत्यक्ष वनाधिकारी यांना दाखविले. सदर आरोपीविरुद्ध प्राथमिक वनअपराध सूचना जारी करून आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ दिवसांसाठी सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

सदर प्रकरणी वनसंरक्षक, गडचिरोली डॉ. किशोर मानकर यांचे मार्गदर्शनात व उपवनसंरक्षक गडचिरोली डॉ. कुमारस्वामी शि.र. व सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली सोनल भडके, यांच्या नेतृत्वात पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली डी. व्ही. कैलुके, क्षेत्रसहाय्यक गडचिरोली प्रमोद जेनेकर, भसारकर वनरक्षक इत्यादी करीत आहेत

Gadchiroli Forest Division