लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सशर्त जामिन मंजूर केला. अचलपूर सत्र न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामिन अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी न्या. रोहीत देव यांच्या समक्ष सुनावणी झाली. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याने अचलपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अचलपूर न्यायालयाने तो अर्ज २० जून रोजी फेटाळला होता.
त्यानंतर शिवकुमारने नागपूर खंडपीठात धाव घेत जामिनासाठी विनंती अर्ज दाखल केला. सर्व बाजू लक्षात घेता न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकून घेत बुधवारी सशर्त जामिन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना खंडपीठाने शिवकुमारला दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी सदर पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावावी, पासपोर्ट जमा करावा आणि न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर जाऊ नये, अशा अटी घातल्या आहेत. शिवकुमारतर्फे अॅड, फिरदोस मिर्झा यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा :
साडेपंधरा हजार पदांची भरतीप्रक्रिया लवकरच; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा