लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ४ एप्रिल: एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० वाजता नक्षल्यांनी बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.
मृतक रामा तलांडी हे १० वर्ष उपसरपंच पदावर कार्यरत होते. बुर्गी येथे एका लग्न समारंभात डीजे लावत असतांना साध्या वेशात आलेल्या नक्षल्यांनी तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व जंगलात पसार झाले. यात रामा तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी रामा तलांडे यांनी फडणवीस यांना रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.