लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीड : दि. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मोर्च्यात मोठया संख्येने लोकांचा जमाव झाल्याचे दिसून आले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्त्या होऊन २० दिवसापेक्षा जास्त दिवस उलटूनही आरोपींना अटक झालेली नसल्याने मुलगी वैभवी संतोष देशमुख व देशमुख कुटुंबाने दिलेल्या हाकेला सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होऊन घटनेचा निषेद केला.
मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या व दोन कोटी रुपयांची खंडणी या दोन गुन्ह्यांतील आरोपी वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सीआयडीने फ्रीज केले आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात आरोपीचा शोध घेत आहेत. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी शनिवारी निघालेल्या मोर्चातून करण्यात आली होती.
पोलिसांनी घटनेनंतर एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी केली असता ते जुळले असल्याचा मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागलेला आहे. आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आलेली असून सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या पासपोर्टबाबतही कारवाई केली जाणार असून त्यांना देश सोडून जाता येणार नाही. छ. संभाजीनगर सीआयडीचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे बीड शहर ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत. राष्ट्रवादी युवती महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना रविवारी सकाळीच बीड शहर पोलिस ठाण्यात चौकशीस आणले असून रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती.
६ डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्कीचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. त्यानंतर ९ डिसेंबरला अपहरण करून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. ११ डिसेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्याला २ कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मीक कराडसह तिघांवर गुन्हा दाखल झाला. मस्साजोग सरपंच हत्या, खंडणी आणि मारहाण प्रकरणाचे तीनही तपास सध्या सीआयडी करीत आहे. परंतु २० दिवस उलटले तरी यातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह पाच आरोपी मोकाटच आहेत. याबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांच्या मौनामुळे तपासावरच आता प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा,
ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..
जिल्हयातील २ हजार २२७ युवा बेरोजगारांना ‘मुख्यमंत्री दूत’ म्हणुन संधी !