लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २५ मे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या इंदिरा गांधी चौकात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एक युवक ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रकवर दगडफेक करत काचा फोडल्या. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत युवकाचे नाव गणेश चौधरी (४०, रा. मूल, जि. चंद्रपूर) असून, ते चंद्रपूरच्या खादी ग्रामोद्योग कार्यालयात कार्यरत होते. सध्या ते गडचिरोलीतील राहुल कंटकवार यांच्याकडे पाहुणा म्हणून आले होते.
अपघात कसा घडला?
चामोर्शीवरून येणारा एमएच ३४ बीजी ७१३५ क्रमांकाचा ट्रक शहरात जड वाहतूक घेऊन दाखल झाला होता. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास इंदिरा गांधी चौकातून धानोरा मार्गाकडे वळताना, रस्ता ओलांडणाऱ्या गणेश चौधरी यांना ट्रकने जोरदार धडक दिली. धडके नंतर ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्ताचे लोणचं सांडले होते.
चालक पसार, जमाव संतप्त..
अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केले. काही मिनिटांतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाहून लोकांमध्ये संताप उसळला आणि जमावाने ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने मृतदेह उचलण्यास विरोध केला. रुग्णवाहिका आल्यावरही सुमारे अर्धा तास मृतदेह उचलण्यास परवानगी देण्यात आली नाही.
आमदार घटनास्थळी, नागरिकांमध्ये संताप…
घटनेची माहिती मिळताच आमदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी शहरातील वाढत्या जडवाहतूक आणि ट्रकच्या बेदरकारपणावर नाराजी व्यक्त केली. जड वाहतुकीमुळे शहरातील चौकांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढत असून, प्रशासन हात झटकून मोकळे झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आधीच सकाळी एक अपघात विशेष म्हणजे, याच चौकात सकाळच्या सुमारास एका जड वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. त्या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
नियंत्रण कुठे आहे?..
वाहतूक विभागाकडून ट्रकवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वाहने नेमली असली, तरी अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही. ट्रकच्या अतिवेगाने आणि बेपर्वाईने शहरातील नागरिकांची झोप उडाली असून, जड वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी आता उग्ररूप धारण करू लागली आहे.
घटनेचा तपास सुरू..
या प्रकरणी गडचिरोली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.