नवविवाहित जोडप्यांने तापी नदीवरील प्रकाशा धरणात केली आत्महत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार :-तालुक्यातील जून मोहिदे गावातील नवविवाहित – पावबा लक्ष्‍मण भिल वय 22 – सुशिलाबाई पावबा भिल वय 20 वर्षे यांनी घरी दवाखान्यात जात असल्याचे सांगून मंगळवारी दुपारी दोघांनी एकमेकाच्या कमरेला दुपट्याने बांधून तापी नदीवरील प्रकाशा धरणावरून पाण्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रकाशा बॅरेज वर त्यांची बाईक उभी असल्यामुळे नातेवाईकांनी तपास सुरु केला होता.

काल दिवसभर पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांद्वारे तपास कार्य सुरू होते. दोन दिवसानंतर आज सकाळी त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. सहा महिन्यापूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. नेमकं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबद्दल प्रकाशा पोलीस अधिक तपास करत आहे. या आत्महत्येमुळे प्रकाशा बॅरेज वरील सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षारक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेला नाही. सीसीटीव्ही देखील बंद आहे. संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.