माणुसकीला काळिमा फासणारी घटना… टेम्पोत सापडले स्त्री जातीचे बेवारस अर्भक…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नालासोपारा, दि. २३ ऑगस्ट : नालासोपारा पूर्वेकडील अंबावाडी परिसरात रोडवर एक स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक सापडले.

संतोष राजपूत(४७) हे पहाटेच्या साधारण साडेपाचच्या सुमारास कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी निघाले असताना त्यांना हे अर्भक आढळून आले. अंबावाडी रोड वरील शादी डॉट कॉम हॉल समोर एक मालवाहू तीन चाकी टेम्पो उभा होता, त्या टेम्पोमध्ये हे अर्भक आढळून आल्याने राजपूत यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने तुळीज पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्या अर्भकाला तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

पोलीस या घटनेचा तपास करीत असून हे नवजात अर्भक अनैतिक संबंधातून जन्मले असावे.हे संबध लपविण्यासाठी हे अर्भक टेम्पोत सोडून संशयित पसार झाले असावेत. असा पोलिसांचा कयास आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अर्भक बेवारसपणे सोडणाऱ्याचा तपास चालू आहे.