लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड 17 फेब्रुवारी :- जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या भंगार दुकानाच्या आड बेकायदा गांजाची साठवणूक करुन, त्याची स्थानिक बाजारपेठेत छुप्या मार्गाने विक्री करणार्या एकाला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 4 किलो गांजा व 28 चिलिम असा एकूण 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहा उपविभागात काही इसम आपल्या मूळ व्यवसायाच्या आड अंमली पदार्थाची साठवणूक करुन त्यांच्या स्थानिक बाजारपेठेतील विक्रीतून अवाजवी आर्थिक लाभ मिळवत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना आदेश दिले होते.
मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी प्राप्त केली आणि 15 फेब्रुवारी रोजी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत चिकणी गावातील एहसान गॅरेजच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानासमोर सापळा रचण्यात आला. यावेळी केलेल्या कारवाईत मोहन हंनू राठोड (रा.चिकणी, ता.रोहा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 4 किलोग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ आणि गांजाचे सेवन करण्याकरिता उपयोगात येणार्या 28 चिलिम असा एकूण 48 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. राठोड याने भंगाराच्या दुकानात हा गांजा बेकायदेशीरपणे साठा करुन ठेवला होता.
याप्रकरणी मोहन राठोड याच्यावर नागोठणे पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोेलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे हे करीत आहेत. मोहन राठोडने ‘गांजा’ कोठून मिळवला? त्याचा तो कशाप्रकारे विनीयोग करणार होता? तसेच त्याच्यासोबत इतर कोणी साथीदार आहेत काय? याचा तपास सुरु आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनानुसार, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली व परि.पोलीस उपअधीक्षक सुहास शिंदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे आणि पोलीस अंमलदार प्रशांत दबडे, स्वप्नील येरुणकर, राजेंद्र गाणार या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.