रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या हत्याराला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे : आर्य – वैश्य – कोमटी समाजाची मागणी

असा गुन्हेगार समाजात नको — फाशी द्या...

लोकस्पर्श नियोजन नेटवर्क,

अहेरी : नागेपल्लीचे प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र तंगडपल्लीवार यांची अमानुष पद्धतीने हत्या झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात संताप आणि हळहळ पसरली आहे. १८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या तंगडपल्लीवार यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळील दाट जंगलात सापडला. घटनास्थळी दिसलेल्या जखमा, कुर्‍हाडीने केलेले खोलवर वार, एका हाताची बोट छाटलेली अवस्था पाहून स्थानिक नागरिक आणि व्यापारी समाजाच्या मनात घोर राग, आक्रोश आणि भय निर्माण झाले आहे. अशी क्रूरता केवळ खुनापुरती मर्यादित नाही, तर माणुसकीलाच काळिमा फासणारी असल्याची भावना समाजाने व्यक्त केली आहे. यामागे वैयक्तिक वादापलीकडे खोल कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा परिसरात आहे.

या हत्येचा आघात एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही. तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीसाठी जात असताना दिना नदीवरील पुलावर अपघात झाला, ज्यामध्ये सुनील कोलपाकवार आणि यादव कोलपाकवार या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. एका हत्येच्या घटनेतून तीन जीव गेले आणि तीन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला. नागेपल्ली आणि अहेरी परिसरात हळहळ, संताप आणि न्यायासाठी आक्रोशाची लाट पसरली आहे.

आर्य वैश्य कोमटी समाजाचे नागेपल्ली, आलापल्ली आणि अहेरी परिसरातील समाजबांधव या घटनेवर संताप व्यक्त करत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडली आहे. समाजाने सांगितले आहे की, समय्या मलय्या सुंकरीसारखा क्रूर गुन्हेगार जर सौम्य शिक्षा मिळवला, तर समाजावर चुकीचा संदेश जाणार आहे. आरोपीला कठोर फाशीची शिक्षा द्यावी, गुन्ह्याचा सखोल तपास करून मास्टरमाईंड शोधावा, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, असे ठामपणे सांगितले आहे.

सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मरावबाबा आत्राम , पोलिस अधीक्षक गडचिरोली यांना निवेदनाद्वारे पोहोचवण्यात आले असून, या प्रकरणात जर कठोर आणि ठोस कारवाई झाली नाही, तर समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना आर्य वैश्य कोमटी समाजाचे पदाधिकारी, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment