लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम, दि. ४ जून : वाशिममधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर कलम 376 सह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षकाने घेतला ओळखीचा गैरफायदा
वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विश्वकांत गुट्टे 2007 मध्ये पीएसआय पदावर कार्यरत होते. त्यावेळी तक्रादार महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे आपल्या घरी आले आणि त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणी काल वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितलं. पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा :
बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री लॉकडाऊनमुळे काम गेल्याने करीत होत्या वेश्याव्यवसाय!