अवैध मार्गाने रेशन दुकानातील 490 क्विंटल गहू, तांदूळ नेतांना रंगेहाथ अटक..


गडचिरोली, दि. १ ऑक्टोंबर : जिल्ह्यातील आष्टी येथील काही रेशन दुकानातून आणलेला गहू तांदूळ चोरट्या मार्गाने तेलंगाना राज्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आपली तपास चक्री फिरवून ताबडतोब कारवाई करीत आष्टी कोनसरी येथील अभिजित किराणा दुकानात अवैध मार्गाने आणलेला रेशन चा 250 क्विंटल गहू ,आणि आष्टी परिसरातील सोनल बोंगिरवार यांचे दुकान आहे.

अवैध मार्गाने आणलेला रेशन दुकानातील तांदूळ 240क्विंटल असा एकूण 490क्विंटल बाजारभावाप्रमाणे 14लाख रुपये किंमती चा अन्न धान्य 2 ट्रक वाहनातून नेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

आष्टी परिसरात काही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून,आणि आष्टी पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून अन्न धान्य अवैध मार्गाने विकण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अन्न धान्य मोफत दिले जात असल्याचा फायदा घेऊन, सदर दोन्ही किराणा दुकानदारांनी अनेक रेशन दुकानातील गहू तांदूळ जमा करून अवैध मार्गाने दुसऱ्या राज्यात पाठविण्याचा डाव आखला होता, परंतु काही जागरूक नागरिकाने तक्रार केल्यामुळे दुकानदारांची पोलिसांची आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मिलीभगत उघडकीस आली आहे.

सदर घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली असता बऱ्याच दिवसांपासून आष्टी परिसरात अवैध मार्गाने रेशन दुकानातील गहू तांदूळ विक्री होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून जिल्हाधिकारी संजय मीना,आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे कडे करण्यात आली होती.

सदर कारवाईत दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले असून आवश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या कारवाई मुळे चामोर्शि तालुक्यातील अवैध धंद्यांना चालविणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहे.