लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली : विद्यार्थी जीवनातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि आयुष्याला नवी दिशा देणारा क्षण म्हणजे शाळा–महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर उभे राहून घेतलेला निरोप. अशाच भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ज्ञानाची ज्योत पेटवत विद्यार्थ्यांना जीवनाच्या विस्तीर्ण प्रवासासाठी सज्ज करणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद डी. मेश्राम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक खुर्शीद शेख यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष, बदलत्या काळातील आव्हाने आणि यशाच्या दिशेने वाटचाल करताना लागणारी मानसिक तयारी याविषयी अत्यंत प्रभावी आणि जीवनस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे नवे अंकुर फुलले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या सैन्य दलात कार्यरत असलेले प्रमोद गणेश सीडाम तसेच विधी क्षेत्रात कार्यरत असलेले अँड. कौस्तुभ गड्डमवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वतःच्या आयुष्यातील अनुभव कथन केले. संघर्ष, चिकाटी आणि ध्येयप्राप्तीसाठी लागणाऱ्या जिद्दीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने उलगडून सांगितले. त्यांच्या अनुभवकथनाने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रेरणा जागृत झाली.
कार्यक्रमात बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. शिक्षक–विद्यार्थी नात्याची ही भावनिक अभिव्यक्ती उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे योगदान किती अनमोल असते, याची जाणीव या प्रसंगातून प्रकर्षाने जाणवली.
बारावीचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल राखण्याचे महत्त्व पटवून देताना अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातील वाटचालीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षक आणि शाळेशी सातत्यपूर्ण संवाद व समन्वय राखावा, तसेच आदर्श आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संकल्प करावा, असे प्रेरणादायी प्रतिपादन केले.
कार्यक्रमास कु. गुरनुले मॅडम, कु. हेमके मॅडम, विशाल चीलवेरवार सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विशेषतः हनुमंत आदे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन हर्षल धाबेकर यांनी केले.