लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विशेष प्रतिनिधी,सचिन कांबळे,
गडचिरोली : जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची मानली जाणारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा २०२५-२६ नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, गडचिरोली येथील स्वानंदी चंद्रकांत डोईजड हिने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या दिमाखदार यशासह स्वानंदी लेव्हल-२ साठी पात्र ठरली असल्याची अधिकृत घोषणा आयोजकांकडून करण्यात आली आहे.
प्लॅटिनम जुबली हायस्कूल, गडचिरोली येथील इयत्ता चौथी (‘ए’) वर्गात शिकणाऱ्या स्वानंदीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विज्ञान विषयात विदर्भातून प्रथम क्रमांक, महाराष्ट्र राज्यातून ३७२ वा आणि जगभरातून ४०९ वा क्रमांक मिळवत गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशामुळे शाळा परिसरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वानंदीला विज्ञान विषयाची विशेष ओढ असून, भविष्यात याच क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन संशोधनाच्या वाटेवर जाण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. सध्या ती प्लॅटिनम जुबली हायस्कूल, गडचिरोली येथे शिक्षण घेत असून, लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश तिच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची साक्ष देणारे ठरत आहे.
या यशाचे संपूर्ण श्रेय स्वानंदीने आपल्या आई-वडील, गुरुजन आणि शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वानंदी डोईजड हिचे यश आज गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी ‘जागतिक स्वप्न पाहण्याची आणि ते जिद्दीने पूर्ण करण्याची’ प्रेरणादायी ठिणगी ठरत आहे…