लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
‘खास बाब’ प्रवेश प्रक्रियामुळे राजकीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीच जास्त चलती दिसून आली आहे. खास बाब म्हणुन वसतिगृहप्रवेशामुळे गुणवंत असलेल्या मात्र वशीला नसलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असे. आता मात्र खास प्रवेश प्रक्रिया रद्द झाल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील खास बाब प्रवेशप्रक्रिया करण्यास विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी देखील नुकतेच राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
गडचिरोली : राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहात आता गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. खास बाब म्हणुन देण्यात येणारे प्रवेश पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गुणवत्ता असुनही वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यामधील गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी राज्याच्या विविध भागांत २४३ शासकीय वसतिगृहे चालविण्यात येत
आहेत.
या वसतिगृहामधून गेल्या अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यांची शिदोरी तयार केली. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा लाभ घेता आला. दरम्यान २४३ वसतिगृहापैकी २८ वसतिगृहामध्ये अत्यंत गुणवंत विद्यार्थ्यांनाच नियमानुसार प्रवेश देण्यात येतो. ही वसतिगृहे वगळता उर्वरीत वसतिगृहामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागापैकी १० टक्के जागा शासनस्तरावरून भरण्यात येत असतात तर ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.