महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच!- डॉ. सुखदेव थोरात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

15 जुन – 2020 च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असला तरी महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत. अभ्यासक्रमाच्या आराखड्यात प्रत्यक्ष काय शिकवायचे दिलेले नाही; परंतु अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. अभ्यासक्रमाचा आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सूचित करत असतो. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवायचे हे सांगतो. बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञान तसेच रोजगारक्षमता वाढवणे, चांगले नागरिक घडवण्यासाठी तरुण पिढीमध्ये नैतिक मूल्ये बिंबवणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहेत. मात्र ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आराखडा काय शिकवायला सांगतो?

इतर काही घटकांसोबत भारतीय ज्ञान परंपरा शिकवा असे त्यात म्हटले आहे. परंतु भारतीय पद्धतीनुसार वेद, पुराण, उपनिषद, मनुस्मृती आणि गीता ही तत्वज्ञानांची ब्राह्मणी परंपरा या आराखड्याला सुचवायची आहे. जैनिझम, बुद्धिझम, शिखीझम, लोकायत आणि इतर अनेक परंपरांकडे त्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे. गीतेच्या कर्मसिद्धांताचा त्यात विशेषत्वाने उल्लेख येतो. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक १ ते २५ तिसरी ते पाचवीपर्यंत, २६ ते ५० सहावी ते आठवीपर्यंत शिकवावे असे प्रस्तावित आहे. नववी ते बारावीसाठी गीतेचा १२ वा अध्याय नेमण्यात आला आहे. ‘नॉलेज ट्रॅडिशन अॅण्ड प्रॅक्टिसेस ऑफ इंडिया’ या विषयात गुरुशिष्य परंपरा शिकवणे अभिप्रेत आहे. पुरोगामी महाराष्ट्र विद्यार्थ्यांना शिकवा असे प्रस्तावित असले तरीही त्यात केवळ मध्ययुगीन संत परंपरेचा समावेश आहे.

एकोणिसाव्या शतकातील सुधारणा, फुले, रानडे, आंबेडकर, शिंदे यांचे कार्य वगळण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या व्यक्तींची नावेही कोठे दिसत नाहीत. मूल्यशिक्षण हे एक उद्दिष्ट असून त्यात शांतता, समता, बंधुत्व, सर्वसमावेशकता, घटनेची तत्वे, लोकशाही अशा अनेक गोष्टी येतात. परंतु मूल्यसंकल्पना भारतीय ज्ञान परंपरेतून उचलण्यात आली आहे. त्यामुळे गीतेतील निष्कर्म सिद्धांत तेवढा शिकवला जाईल. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मूल्य हे वेद, पुराणे, स्मृती, मनुस्मृती आणि उपनिषदातून घेण्यात आले आहे.

मूल्यांविषयीचे प्रकरण मनुस्मृतीतील वचनाने सुरू होते. गीतेतील निष्कर्म सिद्धांत, फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहा असे सांगतो. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना असा शिकवला जाईल की त्यांनी काम करावे पण (शिकत असताना) गुणांची आणि पुढे फळाची अपेक्षा ठेवू नये. समता त्याग अहिंसा ही जैनिझम, बुद्धिझम आणि शिखीझममधील शिकवण मात्र पूर्णपणे दुर्लक्षिलेली आहे. समता, भेदभाव आणि दारिद्र्य या प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांना जाणीव देणे हे एक उद्दिष्ट असले तरी अस्तित्वात असलेली जातिव्यवस्था, लिंग विषमता याविषयी मुलांना सांगणे टाळले आहे. एकंदर ३२७ पानांच्या अभ्यासक्रमात कुठेही जात किंवा अस्पृश्यतेचा उल्लेखही आलेला नाही हे अत्यंत धक्कादायक होय. शालेय विद्यार्थ्यांना नेमके काय सांगायचे आहे हे या खोटेपणातून स्पष्ट होते.

जातिव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केलेली नाही तर ती ब्रिटिश सरकारने आणली असे हा अभ्यासक्रम म्हणतो ब्रिटिशांनी जात जनगणना केली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकात पुरावे दिले, की जातिव्यवस्था ब्राह्मणी समाजाची सामाजिक निर्मिती होती. वेद, पुराणे, उपनिषदे, स्मृती, गीता, रामायण आणि महाभारत अशा सर्व ब्राह्मणी साहित्याने तिचे समर्थनच केलेले आहे. भारतीय संस्कृती स्त्रियांचा मोठा आदर करते असे या अभ्यासक्रमाने खोटे सांगितले आहे.

बालविवाह, सतीची प्रथा, महिलांवर होणारे अत्याचार या गोष्टी दुर्लक्षिल्या आहेत. पश्चिमी देशातील वर्णभेद, गुलामी, शोषण याविषयी हा अभ्यासक्रम बोलतो, पण आपली जातव्यवस्था, अस्पृश्यता आणि महिलांचे शोषण यावर मौन बाळगतो. उपरोल्लेखित मुद्दे लक्षात घेता हा अभ्यासक्रम अजिबात पुढे रेटला जाता कामा नये. त्यावर व्यापक चर्चा व्हायलाच हवी.

हे पण वाचा :-