लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दिनांक ६ एप्रिल: मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार या महिन्यातही अजून झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने मिळाले. तर मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा उजाडला तरी अद्याप झालेले नाहीत. केवळ शिक्षण विभागातील दिरंगाईमुळेच हे घडत असल्याचं वित्त विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोविडमुळे निधी वितरण दर महिन्याला मागणीनुसार होत आहे. पगाराची सर्व रक्कम खात्याने वेळीच मागितली पाहिजे. मात्र शिक्षण विभागाकडून असे होताना दिसत नाही. परिणामी त्याचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागतो, अशी तक्रार शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.
पगार उशिरा झाल्यामुळे गृह कर्जाचे हफ्ते, इतर हफ्ते आणि दैनंदिन खर्च भागवणे मुश्किल होते. तसेच हफ्ते चुकल्यामुळे दंड सहन करावा लागतो, असंही मोरे यांनी म्हटलं आहे.
याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड पत्र पाठवले आहे.
शिक्षण विभागाचे सचिवालय राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या पगाराबाबतीत गंभीर नसल्यामुळेच दर महिन्याला पगार उशिरा होत आहेत, असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रात केला आहे.
मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार युनियन बँकेतून करण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी अद्यापही झालेली नाही. दोन वर्ष होऊनही करारनामा पुनर्स्थापित करण्यात आलेला नाही. त्यामुळे युनियन बँकेला पगार वितरणामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असंही कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.