प्रोजेक्ट स्कूल ऑन टॅब धारावीतील मुलांना मोबाईल टॅब द्वारे देत आहेत शिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क : लॉकडाऊन लागला आणि शाळा भरणं बंद झालं. प्राथमिक ते माध्यमिक सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असल्यास मोबाईल/कॉम्प्युटर/टॅब/लॅपटॉप, इंटरनेट सुविधा उपलब्ध असणं अनिवार्य झालं. सुविधा असणाऱ्यांची शाळा सुरू राहिली. नसणारी साधांनाच्या अनुपलब्धतेमुळे शिक्षणापासून वंचित राहिली. ऑनलाईन शिक्षण मिळणारे आणि न मिळणारे अशी दरी निर्माण झाली.

लॉकडाऊन काळात जिथे अन्नासाठी रक्कम नव्हती तिथे मोबाईल आणि इंटरनेटच्या खर्चाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे शैक्षणिक संकट जसं जगावर ओढवलं तसंच धारावीवरही ओढवलं. किंबहुना दुपटीने, कैक पटीने जास्त प्रमाणात ओढावलं. धारावी लॉकडाऊन ने होरपळून निघाली, आज थोड्या बहुत प्रमाणात शहर सुरू झालंय, धारावीही सावरते आहे. आजही इथल्या तिसऱ्या घरात मनाला चटका लावणारं दुःख आहे, दारिद्रय आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आहे. कोविड मुळे गमावलेली माणसं आहेत. कोविड काळात झालेलं नुकसान दीर्घकाळ भरून न निघणारं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर Center For Transforming India या संस्थेने Dharavi Foundation च्या सहकार्याने धारावीतील मुलांचा ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाचं नावं आहे, Project: School On Tab. या उपक्रमअंतर्गत धारावीतील ५०० किंवा अधिक गरजू आणि होतकरू मुलांना शिक्षणासाठी मोबाईल टॅब उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

या गुरुवारी, १ जुलै रोजी धारावीतील नाईक नगर, राजीव गांधी नगर, भारतीय चाळ या भागातील ५० मुलांना टॅब देऊन या उपक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. इतर भागांत सर्वे चे काम सुरू आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचणे हाच हेतू. या कामासाठी CFTI च्या ट्रस्टी तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख असलेल्या चित्रलेखा ताई पाटील यांनी खास धारावीकरिता पुढाकार घेतला यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक भागातील प्रमुख महिलेच्या हस्ते या टॅबस् चे वितरण करण्यात आले.

शिक्षणासाठी साधनांच्या अनुपलब्धतेसोबतच धारावीवासी सध्या अनेक आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. यातलं आणखी एक संकट म्हणजे लॉकडाऊन मुळे कमाई नाही आणि म्हणून मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही, फी मध्ये सवलत नाही, फी नाही तर ऑनलाईन वर्गात प्रवेश नाही. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निर्देशांची अमंलबजावणी शून्य आहे. शाळांनी फी भरण्याची सक्ती करु नये, शुल्क वाढ करू नये, मुलांना वर्गात प्रवेश नाकारू नये असे निर्देश असून सुद्धा शाळा पालक आणि विद्यार्थ्यांच्या विनवण्यांना जुमानताना दिसत नाहीत.

आज टॅब हे ऑनलाईन शिक्षण सुकर करण्यासाठीचं विद्यार्थ्यांच्या हक्काचं साधन आम्ही मुलांच्या हातात सुपूर्त केलं आहे. त्याबरोबरीनेच त्या प्रत्येकाला त्यांच्या हक्काचं शिक्षण उपलब्ध व्हावं, कोणीही त्यापासून वंचित राहू नये यासाठीचा लढा आणि प्रयत्न आम्ही अविरत सुरू ठेवू.  

साम्य कोरडे

 

 हे देखील वाचा : 

नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी, जनजीवन झाले विस्कळीत

‘या’ बाजार समितीसह जिल्ह्यातील सहा बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद

भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

 

dharavi foundationlead storymumbai