लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,११ नोव्हेंबर: नाशिक येथील मीना ताई इनडोअर स्टेडियममध्ये ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भामरागडचा ताडगाव येथील ईएमआरएस विद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी जालेंदराव आलाम हिने राज्यपातळीवर गडचिरोलीचा झेंडा फडकावला आहे. तिने अंडर-१९ वयोगटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली.
कु. वैष्णवीच्या या यशामुळे ईएमआरएस भामरागड (ताडगाव) विद्यालयाचे नाव राज्यभर उजळले असून तिच्या मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने संपूर्ण जिल्ह्याचा मान वाढवला आहे. या सुवर्णयशानंतर वैष्णवीची निवड आता राष्ट्रीय स्तरावरील ईएमआरएस क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली आहे.
या कामगिरीमागे विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती नेहा तिवारी यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण विशेष महत्त्वाचे ठरले. विद्यालयाचे प्राचार्य अनिल ए. रामटेके, व्यवस्थापन तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी वैष्णवीचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्गम भामरागडसारख्या आदिवासी भागातून राज्यस्तरावर झळकलेली वैष्णवी आलाम ही विद्यार्थिनी आता ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमी मुलामुलींसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. तिच्या या यशाने दुरवरच्या शाळांमधूनही सोन्याचे पदक तयार होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे…