लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, : कला, सर्जनशीलता आणि तरुणाईच्या उत्साहाचा मिलाफ घडवणाऱ्या ‘भरारी २०२५–२६’ या तीन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाने गोंडवाना विद्यापीठ येथील परिसर अक्षरशः रंगतदार वातावरणाने भारावून टाकला आहे. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवात विविध कला प्रकारांच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत असून तरुणाईच्या आत्मविश्वासाला नवी झेप मिळत असल्याचे चित्र विद्यापीठ परिसरात पाहायला मिळत आहे.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, वडसा येथील प्राचार्य डॉ. श्रीराम गहाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून मौसीनभाई जवेरी महाविद्यालय, वडसा येथील प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे ललित कला विभागाच्या विभागप्रमुख डॉ. संयुक्ता थोरात , विद्यार्थी विकास संचालक डॉ, प्रिया गेडाम, प्राध्यापक डॉ.प्रदीप चापले तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांना उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, वकृत्व स्पर्धा, वादविवाद, प्रश्नमंजुषा, लघुपट निर्मिती, चित्रकला, पोस्टर स्पर्धा, मातीशिल्प, चित्र कोलाज, रांगोळी, छायाचित्रण, समूहगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, तालवाद्य, पाश्चात्य गायन व वाद्यसंगीत, नाट्यसंगीत, मिमिक्री, लघुनाट्य, एकांकिका तसेच माईम अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची, कलात्मकतेची आणि आत्मविश्वासाची प्रभावी झलक पाहायला मिळत आहे.
५ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा युवा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा ठरत आहे. संगीत, नृत्य, अभिनय आणि विविध कलांच्या माध्यमातून तरुणाईची सर्जनशील ऊर्जा व्यक्त होत असून विद्यापीठ परिसरात सांस्कृतिक चैतन्याची लहर निर्माण झाली आहे.
दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘भरारी’ महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देतो. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा महोत्सव ज्ञान, कला आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरत असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळत आहे.