अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थाटात प्रारंभ; ‘कालिया मर्दन’ने रसिकांना भुरळ घातली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

छत्रपती संभाजीनगर – अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ‘कालिया मर्दन’ या ऐतिहासिक मुकपटाने 105 वर्षांनंतर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोलकात्याच्या ‘सतब्दीर सब्द’ या वाद्यवृंदाने थेट संगीत सादरीकरणाद्वारे या मुकपटाला सजीव रूप दिले.

वाद्यवृंदात सात्यकी बॅनर्जी, सुचल चक्रवर्ती, तीर्थंकर बॅनर्जी, सुमंत्र गुहा, सौमाल्य सरेश्वरी आदी कलावंतांचा समावेश होता. मुकपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात फाळकेंच्या कलेला दाद दिली.

सई परांजपेंना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार
महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपेंना ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. परांजपे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात दूरदर्शन वाहिनीत निर्माती म्हणून काम केले. “तो अनुभव पुढील दिग्दर्शकीय प्रवासासाठी उपयोगी ठरला,” असे त्यांनी सांगितले. “आज उशिरा का होईना, माझ्या कामाची दखल घेत सन्मान केला याचा मला आनंद आहे,” असे नम्रपणे स्वीकारताना त्या म्हणाल्या.

मराठी सिनेमाच्या प्रगतीबद्दल बोलताना परांजपे म्हणाल्या, मराठी चित्रपटांनी आता मोठी उंची गाठली आहे. वर्षाला ५०-६० सिनेमे तयार होतात आणि त्यातील अनेक सिनेमे मातीतील विषयांवर आधारित असतात. होतकरू दिग्दर्शकांची तळमळ, सामाजिक जाणिवा आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असे हे चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला थेट भिडतात.

चित्रकला व शिल्पकलेच्या परंपरेचे अनुकरण – आशुतोष गोवारीकर

प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी भारतीय चित्रपट परंपरेचा ऐतिहासिक संदर्भ विशद केला. सेल्युलोयड सिनेमा सुरू होण्याआधी भारतात कथा सांगण्याची कला शिल्पे आणि चित्रांच्या माध्यमातून प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. अजिंठा व वेरुळ लेणी ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

65 चित्रपटांची मेजवानी आणि चर्चासत्रे

या पाच दिवसीय महोत्सवात 65 चित्रपटांची विशेष मेजवानी रसिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. नवोदित कलाकारांसाठी तांत्रिक चर्चासत्रे ठेवली असून ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महोत्सवाच्या समारोपासाठी फराह खान यांची उपस्थिती महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

सिनेसृष्टीला महाराष्ट्र सरकारचे प्रोत्साहन

चित्रपट हा सॉफ्ट पॉवर असून, भारतीय जीडीपीत ०.७ टक्के योगदान देतो. भविष्यात मनोरंजन उद्योग २ ते २.५ टक्क्यांपर्यंत जीडीपीत योगदान देईल. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देत असून वर्षाला १०० कोटींचे अनुदान दिले जाते, असे राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने इव्हीजीएस केंद्र महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. सध्या चित्रपट निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे या केंद्रामुळे हे सुलभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चित्रपट उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पुरुष दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेचा धडा घ्यावा – सई परांजपे

पुरुष दिग्दर्शक जिथे हिंसा अधिक दाखवतात, तिथे महिला दिग्दर्शक संवेदनशील विषय हाताळतात. याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो. पुरुष दिग्दर्शकांनी महिला दिग्दर्शकांकडून ही संवेदनशीलता शिकावी, असे सई परांजपे यांनी सुचवले.

या महोत्सवाने मराठवाड्याला जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील हक्काचा ठसा उमटवण्याची संधी दिली आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांचे प्रधान सचिव संजय जाजू हे काही कारणास्तव उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीत.

 

AIFFfilm festival 2025