लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
प्रेक्षकांसोबत एक जिव्हाळ्याचं नातं जपलं – जे नातं तिकीट घेतल्यावर नव्हे, तर हसून हरवल्यावर तयार होतं. आणि हेच नातं त्यांच्या अभिनयाला चिरंतनता देतं. अशा या रंगभूमीच्या अजोड नटव्रतीला, झाडीपट्टीतील अजरामर कॉमेडीकिंग के. आत्माराम यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या विनोदी निष्ठेला, अभिनयप्रेमाला आणि रंगभूमीवरील सेवेपुढे करांगळीने नतमस्तक होण्याची हीच एक सजग सांस्कृतिक मानवाची अभिव्यक्ती म्हणावी लागेल.”
प्रा. राजकुमार मुसणे
झाडीपट्टी रंगभूमीच्या रंगपटलावर गेली पाच दशके प्रेक्षकांच्या ओठांवर हास्यफुलं फुलवत, त्यांच्या मनामनावर विनोदाची शाईने नक्षी काढणारा आणि अस्सल अभिनयाने प्रत्येक भूमिकेला जिवंत करणारा एक नटसम्राट म्हणजेच के. आत्माराम! झाडीपट्टी रंगभूमीवरील ‘कॉमेडीकिंग’ म्हणून ज्यांची ओळख सर्वदूर आहे, ते आत्माराम अंताराम खोब्रागडे – ‘के. आत्माराम’ या रंगनावाने जे जगप्रसिद्ध झाले.
भंडारा जिल्ह्यातील कन्हाळगाव या छोट्याशा खेड्यात, २२ जून १९६१ रोजी कमलाबाई व अंतराम यांच्या पोटी जन्मलेला हा मुलगा, नंतरच्या काळात झाडीपट्टीच्या सांस्कृतिक आकाशातील झळाळता तारा बनला. प्रतिकूलतेतून संघर्ष करत, शिकत, शिकवत आणि रंगभूमीवर स्वहस्ते विनोदी स्वप्नं रंगवत आत्माराम सरांनी शिक्षक, लेखक, वक्ता, नेपथ्यकार, संयोजक आणि हास्यपुरुष अशा विविध रुपांमधून स्वतःचा बहुआयामी ठसा उमटविला. चार हजारांहून अधिक नाट्यप्रयोगांमध्ये त्यांनी कधी सोंगाड्या, कधी मामा, कधी बाईलवेडा गावठी, कधी कुत्र्यांवर भुंकणारा टकल्या, तर कधी फसवणारा झाडीपट्टीचा देवदास अशा अफाट प्रकारच्या व्यक्तिरेखा इतक्या सहजतेने रंगवल्या, की प्रेक्षकांनी त्यांना हसताहसता आपल्या मनात कायमचं स्थान दिलं.
मिंडाळा येथील माध्यमिक विद्यालयात ३२ वर्ष सेवा करून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यावरसुद्धा त्यांनी रंगभूमीशी असलेलं नातं अबाधित ठेवत अनेक नाट्यसंस्थांमधून अभिनय केला. नवतरुण नाट्य मंडळ, पंचशील नाट्य मंडळ, गनी भैय्या यांची भारत प्रेस, महालक्ष्मी प्रेस, महाराष्ट्र रंगभूमी आणि चंद्रकमल थिएटर्स अशा एकाहून एक नामवंत नाट्यसंस्थांमधून त्यांनी प्रेक्षकांवर विनोदाचा जादूई माया पसरवला. प्रा. शेखर डोंगरे, पौर्णिमा काळे आणि पायल कडूकर यांच्यासोबतच्या त्यांच्या त्रिकुटांनी नाट्यरसिकांना इतका वेडावून सोडलं की के. आत्माराम यांची ‘एन्ट्री’ म्हणजे हश्याचा भूकंप ठरू लागला.
रंगमंचावरचा त्यांचा रुबाबदार चेहरा, गौरवर्ण, हजरजबाबीपणा, संवादफेक, मुद्राभाव, आणि हास्याचे खळाळणारे झरे त्यांच्या अभिनयातून सळसळत बाहेर पडत. अभिनय करताना जणू ते स्वतः हरवून जातात आणि प्रेक्षकांना आपल्या भूमिकांमध्ये हरवून टाकतात. ‘टकल्या’, ‘बाईलवेडा’, ‘मामा’, ‘फसवेगीर’, ‘उतावीळ’, ‘विक्षिप्त’ अशा अनेक रूपांतून त्यांनी प्रेक्षकांना हास्याच्या लाटा दिल्या. त्यांनी विनोदाचं केवळ सादरीकरण केलं नाही, तर पात्रांशी तादात्म्य साधत त्यांना पूर्ण रंगवलं. उदाहरणादाखल, ‘पापीपुत्र’ नाटकातील त्यांच्या दमदार दगडफेकीच्या एन्ट्रीसह ‘यांना भी तुमच्यामध्ये दम असेल तर एक एक या ना’ हे भाष्य करत त्यांची रंगमंचीय उपस्थिती अचूकतेची पराकाष्ठा ठरते. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात वयाच्या चौदाव्या वर्षीच ‘डाकू मानसिंग’ या नाटकातील ‘राघू’ या नोकराच्या भूमिकेपासून झाली आणि पुढे त्या अभिनयप्रेमाने त्यांच्या आयुष्याचा श्वास घेतला. ते फक्त अभिनय करणारे नव्हते, ते अभिनयात श्वास घेणारे होते. त्यांनी ‘डाकूजवाला’, ‘डाव जिंकला चटक चांदणी’, ‘माझ्या खिडकीत वाकून पाहू नका’, ‘माझं तुझ्याजवळ गेलेच कसं’, ‘अनाथ’ अशा नाटकांचं लेखन करत विनोदाला सामाजिक अर्थवत्ता दिली. त्यांच्या नाटकात फक्त हशा नसतो, त्यामागे एक विचार असतो, एक प्रबोधन असतं. ‘झाकून किती झाकायचं’ मधील ‘देवदास छक्का’, ‘लावणी भुलली अभंगाला’ मधील ‘सुभान्या’, ‘फाटका संसार’ मधील ‘दामाजी’, ‘टाकलेलं पोर’ मधील ‘पुंडलिक’, ‘बायकोपेक्षा मेहुणी बरी’ मधील त्यांच्या स्त्री भूमिका या आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ‘दाताला क्लिप’, ‘टक्कल’, ‘टापरीगोदी’, ‘बोडीझोक्या’, ‘काळी मस’, ‘घुसमाडतो’, ‘देवगाय’ हे अस्सल झाडीशब्द ज्या आत्मविश्वासाने आणि शरीराच्या लयीत त्यांनी उच्चारले त्यातूनच त्यांनी प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळाचा तंबू उभा केला. आजही साठी पार करून प्रकृती थकलेली असताना त्यांच्या नजरेतली ती खोडकर चमक, विनोदाची ती चुणूक आणि संवादफेकीतली ती अस्सल झाडीपट्टी चव रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकते. त्यांच्या विनोदशैलीतला दर्जा आणि कल्पकता इतका प्रखर आहे की मंडळे त्यांचं नाव वापरून प्रयोग आयोजित करतात आणि तिकीटविक्री सुरू व्हायच्या आतच ‘हाऊसफुल्ल’च्या पाट्या झळकू लागतात. त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून जीवनाला हास्याचा रंग दिला आहे आणि झाडीपट्टी रंगभूमीला प्रतिष्ठेचं स्थान दिलं आहे. ‘मी नाही गा…’, ‘पंधरा दिवस गा…’ हे संवाद केवळ संवाद राहिले नाहीत, ते झाडीसंस्कृतीच्या हास्यपरंपरेचे प्रतीक बनले.
अशा या झाडीपट्टी हास्यसृष्टीच्या यशोयात्रीने केवळ विनोदनिर्मिती केली नाही, तर झाडीपट्टीतील नव्या पिढीला स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी आदर्श आणि दिशा दिली. त्यांनी अभिनयात स्वतःच्या शैलीचा ठसा उमटवत अनुकरण न करता नाट्यप्रतिभेचं स्वतंत्र साम्राज्य उभं केलं.
म्हणूनच त्यांच्या नाट्यकलेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, झाडीपट्टी महोत्सव, आंबेडकरवादी साहित्य संमेलन अशा अनेक मान्य संस्थांनी सन्मानित केलं आहे.
त्यांनी प्रेक्षकांसोबत एक जिव्हाळ्याचं नातं जपलं – जे नातं तिकीट घेतल्यावर नव्हे, तर हसून हरवल्यावर तयार होतं. आणि हेच नातं त्यांच्या अभिनयाला चिरंतनता देतं. अशा या रंगभूमीच्या अजोड नटव्रतीला, झाडीपट्टीतील अजरामर कॉमेडीकिंग के. आत्माराम यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या विनोदी निष्ठेला, अभिनयप्रेमाला आणि रंगभूमीवरील सेवेपुढे करांगळीने नतमस्तक होण्याची हीच एक सजग सांस्कृतिक मानवाची अभिव्यक्ती म्हणावी लागेल.’