झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित

बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार अष्टपैलू अभिनेता शरद केळकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई 1 ऑक्टोबर :-  झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून त्यातून आणखी एका दमदार अभिनेत्याचा तेवढ्याच दमदार भूमिकेतला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी – हिंदी चित्रपटांत आणि वेबसिरीजमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा शरद केळकर. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंची करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट झी स्टुडियोजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हर हर महादेव ही केवळ गर्जना नव्हती तर ती छत्रपतींच्या स्वराज्यासाठी लढणा-या मावळ्यांचा महामंत्र होता. समोरचा गनिम कितीही शक्तिशाली असो त्याला सळो की पळो करुन सोडण्यासाठीची उर्जा निर्माण करणारी, मावळ्यांना नवी उमेद देणारी शिवगर्जना म्हणजे हर हर महादेव. हाच हर हर महादेवचा महामंत्र जपत बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याविरुद्ध घोडखिंड लढवली आणि आपल्या प्राणाची आहूती देत घोडखिंड पावन केली. बाजीप्रभूंच्या याच लढवय्या करारी बाण्याची गाथा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा प्रत्यय आज प्रकाशित झालेल्या मोशन पोस्टरमधून आणि त्यातील संवादातून येत आहे. “जोवर तोफा ऐकू येणार नाहीत तोवर आई विंझाईची आण आहे मला, एकही गनीम ही खिंड पार करु शकणार नाही…हा शब्द आहे बाजीचा.” शरद केळकरच्या दमदार आवाजात हा संवाद ऐकताना अंगावर अक्षरशः शहारा आल्याशिवाय राहत नाही.

 

या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाले की,“आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहे. बाजीप्रभुंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. घोडखिंडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभुंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. ही गोष्ट तेवढ्याच प्रखरपणे आणि सच्चेपणाने प्रेक्षकांसमोर येण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि संपूर्ण टीमने अत्यंत मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना ही गोष्ट नक्कीच भावेल याबाबत माझ्या मनात शंका नाही.”

हे पण वाचा :-