माता व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण!

२६२८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी ; १० कोटी ९५ लक्ष रक्कम थेट मातांच्या आधार लिंक खात्यात जमा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,दि.18: गरोदर व स्तनदा मातांना गरोदपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत काम करावे लागणे, आर्थिक अडचणीमुळे प्रसुती नंतर लगेच शारिरीक क्षमता नसतांना सुध्दा अनेक मातांना कामावर जावे लागते. यामुळे अशा गरोदर व स्तनदा माता अधिकाधीक कुपोषित होऊन तिच्या व नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहीत करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रीत रहावा हा या उद्देशाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अमलात आलेली आहे.


प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ हा लाभार्थ्यांना त्यांच्या आधार सिडेड बँक खात्यात तीन टप्यामध्ये ५०००/- रुपये अदा केले जातात. तसेच जननी सुरक्षा योजनेचा अतिरिक्त लाभ असे एकंदरीत ५७००/- रूपये लाभार्थ्यांना मिळत असतात. या योजनेसाठी लाभार्थी त्यांचा अर्ज व सर्व आवश्यक कागदत्राचे अटी पुर्ण कराव्या लागतात आणि शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासुन ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते अन्यथा लाभ मिळत नाही. तसेच शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील तसेच खाजगी नोकरीतील ज्या मातांना पगारी प्रसुती रजामंजुर आहे अशांना ही योजना लागु होत नाही.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता राज्यस्तरावरुन २५९६० उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यापैकी २६२८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजे या जिल्हयाचे १०० टक्के काम पूर्ण झालेले आहे. सर्व लाभार्थीच्या बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये १० कोटी ९५ लक्ष रक्कम थेट मातांच्या आधार लिंक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. डॉ.समिर बनसोडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी १ खेपेच्या मातांना शासनाकडुन मिळालेले वरदान हया स्वरुपात असुन जिल्हयातील माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास योजना कारणीभूत ठरले असे सुचविलेले आहे.

जिल्हयातील अधिकाधिक मातांनी हया योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने श्रीमती अश्विनी प्र. मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जि गडचिरोली यांनी सर्व पहिल्या खेपेच्या मातांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान केलेले आहे.

गडचिरोली जिल्हयात क्युआर कोड स्कॅनरचे वाटप जिल्हयामधील प्रथम गरोदर व स्तनदा मातांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी, ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा आरोग्यअधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते सर्व बारा तालुक्यामध्ये क्युआर कोड स्कॅनर मशिनचे वाटप करण्यात आले. क्युआर कोड स्कॅनर मशिनच्या आधारे लाभार्थ्याचे आधार कार्ड स्कॅन केले जातात. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेचालाभ मिळण्यास आणखीनच सोईचे होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, यांनी सांगितले.

dr.shishikant shambharkar