राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली!

  • जिल्हा आरोग्य विभाग व कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांचे साटेलोटे.
  • करारनाम्यातील अटी व शर्ती भंग करुनही केल्या जाते वेतन अदा.
  • खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंधन असतांना थाटले आहेत खाजगी रुग्णालय.   

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

तालुका प्रतिनिधी – शालीकराम कराडे

कोरची, दि. १८ मार्च: शासनानी गोरगरिबांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना लट्ठ वेतन देऊन नियुक्त केले आहे. नियुक्ती दरम्यान अटी व शर्ती लागू केले आहेत. तसेच त्या संदर्भातील शासकीय परिपत्रकही राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कार्यालय मुंबई चे तांत्रिक सह संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्ती दरम्यान सक्तीचे करून शासकीय परिपत्रकही काढले असले तरी वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या शासकीय परिपत्रकाला केराची टोपली दाखवली आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जाते त्याठिकाणी बाहेर कुठे जातांना वरिष्टांना माहिती देऊन जाणे बंधनकारक असतांना याठिकाणी वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करतांना दिसून येते. वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी शिवाय मुख्यालय सोडणे, सेवा बजावण्याच्या ठिकाणी वेळेवर उपलब्ध न राहणे. अधिक पैसे कमविण्यासाठी स्वतःचे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने ज्याठिकाणी शासनाने निवड करून जनसामान्यांना आरोग्याची सेवा बाजवण्यासाठी नियुक्त केले आहे त्या ठिकाणी न राहल्याने निरागस व कोवळ्या जिवाला मुकावे लागले आहे.

वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता खाजगी व्यवसाय करित असल्याने नवेझरी येथील दोन मातांसह १३ निरागस व कोवळ्या बालकांना जीव गमवावा लागला. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. तालुका आरोग्य विभागाचे आणि कंत्राटी तत्वावर असलेल्या वैद्यकिय अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या कराराचे  अटी व शर्ती भंग करुनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियमित वेतन व प्रोत्साहन भत्ता सुरळीत दिला जात असल्याने एकूणच आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केल्या जात आहे.   

  • काय आहेत आरोग्य विभागाला सहसंचालक यांनी दिलेले अटी व शर्तीचे नियम.  

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय मुंबई चे तांत्रिक सह संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी  दि ६/१०/२०२० ला परिपत्रक काढले. यात आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी दि २१/०९/२०२० रोजी टिपणी मंजूर केली. समुदाय आरोग्य अधिकारी हे पद पुर्ण वेळ पद आहे, समुदाय आरोग्य अधिकारी यांची कार्यालयीन वेळ सकाळी ८.३० ते सायं ५.०० वाजे पर्यंत राहिल, समुदाय आरोग्य अधिकारी यांना आपात्कालीन परिस्थिती मध्ये कोणत्याही वेळी कर्तव्यावर हजर राहणे त्यांना बंधनकारक आहे, समुदाय आरोग्य अधिकारी यांना खाजगी व्यवसाय करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमुद आहे.

कोरची तालुका अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतो त्या ठिकाणी आरोग्याची सेवा बजावण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून १००/- रु. च्या मुद्रांकावर हमीपत्र आणि त्यात आहे १६ अटी व शर्ती..   

       अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात मुलेटी पद्दीकसा येथे मारोती भलावी, अंतरगाव येथे इंद्रभुषण राऊत, कोहका येथे चंद्रकांत नाकाडे, नवेझरी येथे विद्या बोरकर तर आंबेखारी येथे ज्ञानदिप नखाते या पाच जणांची मानसेवी वैद्यकिय अधिकारी म्हणुन नेमणुक केली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी व मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांनी १००/- रुपयाच्या मुद्रांकावर करारनामा करुन दिलेला असुन एकुण १६ अटी व शर्ती मान्य केल्यानंतरच नियुक्ती आदेश दिलेला आहे. मात्र समुदाय आरोग्य अधिकारी व मानसेवी वैद्यकिय अधिकारी हे मुख्यालयी न राहता, वरिष्ठांची परवानगी न घेता तसेच खाजगी व्यवसायात गुंग असुन देखिल जिल्हा आरोग्य विभाग यांचे नियमित वेतन व प्रोत्साहन भत्ता काढीत आहे. सह संचालक आरोग्य अभियान यांच्या दि ६/१०/२०२० च्या परिपत्रकाला हरताळ फासल्या जात असुन जिल्हा आरोग्य विभागाच्या आशिर्वादाने आदिवासीबहुल रुग्णांच्या आरोग्याशी खेळून संगणमताने शासनाच्या तिजोरीला लावल्या जात आहे चुना.

श्री. अशोक गावतुरे – उपसरपंच ग्रा.पं.बेलगाव (घाट) तथा शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष

आरोग्यवर्धिनीचे उपकेंद्र बेलगाव घाट अंतर्गत कोहका या ठिकाणी डॉ. चंद्रकांत नाकाडे यांची ०४/०४/२०१५ पासून ३१/०३/२०२१ पर्यंत मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र ते नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पल्स पोलिओ कार्यक्रमात फक्त २०१७ -२०१८ मध्ये बघितले आहे. त्यानंतर आजपर्यंत कोविड-१९ च्या महामारीतही त्यांचे दर्शन झाले नाही. वैद्यकीय सेवेसाठी सुसज्ज उपकेंद्राची इमारत असतांनाही आदिवासी भोड्या-भाबड्या जनतेला वेळेवर उपचार न मिळाल्याने स्तनदा माता तसेच गरोदर मातांना उपचारा अभावी जीवास मुकावे लागले. एवढेच नव्हे तर कित्येक निरागस बालकांचे वेळेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने जीवास मुकावे लागले.

 अशोक गावतुरे – उपसरपंच ग्रा.पं.बेलगाव (घाट) तथा शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष

Health Department