सर्पमित्राची अशीही भूतदया; जखमी सापावर शस्त्रक्रिया करून वाचविले प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलडाणा, 26 डिसेंबर: चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथे शेतातील खोदकामा दरम्यान जखमी झालेल्या कोब्रा जातीच्या सापावर पशुंच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जिवनदान दिल्याची घटना 24 डिसेंबर रोजी घडली. बुलडाणा जिल्ह्यात जखमी सापावर अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे.

टाकरखेड हेलगा येथे शेतात खोदकामादरम्यान टिकासाचा फटका बसून एक कोब्रा जातीचा साप जखमी झाला होता. जखमी सापाची अवस्था पाहून उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर आणि बुलडाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर सर्पमित्रांनी जखमी सापाला चिखली येथे आणले. चिखली येथील व्हेटरनरी डॉक्टर युवराज यांनी सापाला भुल देऊन सापाचे बाहेर आलेले आतडे सुयोग्य पद्धतीने व्यवस्थित केले. जखमेच्या ठिकाणी तब्बल 12 टाके देण्यात आले आहेत. सध्या साप सुखरूप असून, तो हालचालही करीत असल्याचे सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी सांगितले.

सध्या हा साप उंद्री येथील सर्पमित्र श्याम तेल्हारकर यांच्याकडे ठेवण्यात आलेला आहे. आगामी 20 दिवस त्याची प्रकृती कशी राहते, त्याच्यामध्ये सुधारणा होतात का, या आधारावर त्याला जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी दिली.