लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी १५ गर्भवती मातांनी नवजात बाळाला जन्म दिला. पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांच्या घरी आनंद, उत्साह आणि चैतन्य पसरलेले असून नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले.
नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रत्येकाला उत्साह अन् चैतन्याचा असतो. प्रत्येकजण नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२५ रोज बुधवारला २४ तासात १५ मातांनी बाळांना जन्म दिला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असून नातेवैकाही मोठ्या आनंदात दिसून येत होते. नवीन वर्षात आपल्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
जिल्हा महिला व बालरुग्णालयात प्रसूतीसाठी अनेक महिला दाखल झाल्या असून त्यामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे. दाखल झालेल्या महिलांपैकी १५ महिलांनी ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजतापासून तर १ जानेवारी रोजी रात्री १२ वाजतापर्यंत नवजात बाळाला जन्म दिला. यामध्ये ९ मुली आणि ६ मुलांचा समावेश आहे. ६० टक्के महिलांची नार्मल प्रसूती तर ४० टक्के महिलांची सिझर प्रसूती झाली असून नवीन वर्षांच्या प्रारंभी गर्भवती मातांनी प्रसूतीच्या वेदना सोसत बाळाला जन्म दिला. यामध्ये एक प्रेमविवाह झालेले जोडपे असून दोघांचे प्रेम जुळले, दोघांनी एकमेकाला साथ देऊन त्यांच्या प्रेमरूपी वेलीवर गोंडस बाळाच्या रूपाने अंकुर फुटले आहे.
प्रसूती झालेल्या मातांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कोणी आईबाबा तर कोणी आजी-आजोबा तर कोणी मामा-मामी तर कोणी काका-काकू बनल्याने आप्तेष्टही मोठ्या आनंदात दिसून येत होते. नव्या वर्षात आपल्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने कुटुंबीयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. दरम्यान जिल्हा महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत आखाडे यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. दडमल, डॉ प्रियांका शेडमाके, भूलतज्ज्ञ डॉ. शीतल येवले, डॉ. केतन कुमरे, इन्चार्ज सिस्टर उत्तरा फेबुलवार, परिचारिका सपना मोहुर्ले, वंदना राऊत, संगिती जुमडे, कोमल गेडाम, संचिता दुर्गे, मिनाश्री राऊत, सुमेधा कांबळे आणि स्वप्निल वंगेवार आदींनी आरोग्य सेवा सांभाळली.
हे ही वाचा,
गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन
चिचडोह बॅरेजचा पाणीसाठा सिंचनासाठी मिळण्याचे नियोजन करा – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ