लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ ऑगस्ट २०२५:
गडचिरोलीसारख्या दुर्गम, नक्षलग्रस्त जिल्ह्यात माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य माहिती आयोगाने गेल्या २० वर्षांत प्रथमच थेट गडचिरोलीत प्रत्यक्ष सुनावणी घेतली, ज्यामध्ये १०० हून अधिक द्वितीय अपील प्रकरणांवर निकाल देण्यात आले.
“माहिती आयोग आपल्या दारी” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत नियोजन भवन, गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीस मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठाचे आयुक्त गजानन निमदेव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या विशेष सुनावणीमुळे नागरिक, जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकरणांना मुंबई किंवा नागपूरपर्यंत प्रवास करण्याची गरज भासली नाही. “ही सुविधा लोकशाही प्रक्रियेला प्रत्यक्ष स्पर्श देते,” असे मत अनेक अर्जदारांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितले की, “या उपक्रमातून २०२३ पर्यंतच्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, लवकरच २०२४-२५ मधील प्रकरणांवरही सुनावणी घेण्यात येईल.” त्यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले आणि नागरिकांच्या माहितीच्या हक्काचे संरक्षण अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली.
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामार्फत गडचिरोलीत प्रथमच अशा स्वरूपात प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, ग्रामविकास, शिक्षण आदी विविध विभागांशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. या उपक्रमामुळे जिल्हा पातळीवरील पारदर्शकतेला चालना मिळाली असून, अनेक जनतेच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच निकाली लागल्या आहेत.
माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी स्पष्ट केले की, “स्थानिक पातळीवर सुनावणी घेतल्याने अर्जदारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो. माहितीच्या अधिकारात पारदर्शकतेसह लोकाभिमुखता टिकवण्यासाठी ही मोठी पायरी आहे.”
‘माहितीचा अधिकार कायदा २००५’ अंतर्गत प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना दोन्ही आयुक्तांनी जनमाहिती आणि अपिलीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, गावागावात आणि विभागागणिक माहितीचा अधिकार कायद्यासंदर्भात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या सुनावणीदरम्यान माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांच्यासह आयोगाचे १० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाकडून या उपक्रमासाठी पुरेपूर सहकार्य करण्यात आले.