१० वी व १२ वी शाळा २१ डिसेंबर पासून सुरु करण्यासाठी पालक व संस्थाचालकांची बैठक घेणार – उपसभापती विधान परिषद डॉ नीलम गोऱ्हे

पुणे डेस्क, १० डिसेंबर:- कोविड मध्ये बंद झालेल्या शाळा, पुन्हा नव्याने सुरू करताना घ्यावयाच्या दक्षताबाबत विचार करणेसाठी आज वेबिनार घेणेत आला. त्यावेळी नीलम गोऱ्हे बोलत होत्या. मुलांचे करियरच्या दृष्टीने १० वी व १२ वीचे वर्ष महत्वाचे आहे. त्यामुळे पुणे शहरामधील १० वी व १२ वीची शाळा २१ डिसेंबर२०२० पासून सुरू करण्यासाठी संस्थाचालक व पालकांची सभा घेणार व आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच ९ वी व ११ वी च्या शाळा ३ जानेवारी पासून सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत असे निर्देश ही डॉ गोऱ्हे यांनी दिले. यावेळी शिक्षण विभागाचे उपसचिव श्री राजेंद्र पवार, सहसंचालक श्री टेमकर, माजी शिक्षण संचालक श्री वसंत काळपांडे, पुणे महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त श्री जगताप, श्री. शिरीष फडतरे, जयश्री देशपांडे,शीतल बापट, राजेंद्र कांबळे हजर होते.
शाळा सुरू करताना आवश्यक काळजी घेण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था तयार आहेत. मात्र शैक्षणिक फी पालकांनी भरावी कारण त्याशिवाय शिक्षकांचे पगार व इतर अनुषंगिक खर्च कसा करणार ? याबाबत शासनाने निर्देश द्यावेत असे राजेंद्र कांबळे म्हणाले. शीतल बापट यांनी शाळा व पालक यांनी विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून एकत्रित तोडगा काढावा असे सांगितले. शिरीष फडतरे यांनी सविस्तर म्हणणे मांडले व विविध स्तरावर आवश्यक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. जयश्री देशपांडे यांनी अनेक पालकांना पाल्याची फी भरताना प्रश्न आहेत त्यामुळे शाळांनी फी वाढ करू नये व पालकांना होत असलेल्या त्रासाबाबत सांगितले.
सध्या ९ ते १२ पर्यंतची शाळा सुरू आहे.त्यामध्ये किती लोकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवत असल्याबाबत सहमती पत्रे दिली ? किती विद्यार्थी शाळेत हजर आहेत ? याबाबत पुणे जिल्ह्यातील ४ तालुक्यातील विविध शाळांचे सर्वेक्षण करावे व त्याचा अहवाल दी २२ डिसेंबर पूर्वी सादर करावा असे निर्देश डॉ नीलम गोऱ्हे यांनी श्री टेमकर यांना दिले. या मध्ये आलेले अनुभवाचा विचार करून विशेष चुका सुधारता येतील व शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोपे होईल असे ही त्या म्हणाल्या.