राज्यात १० वा ‘आयुर्वेद दिवस’ उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई: – लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात १० वा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी पंतप्रधानांचा संदेश वाचण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सचिव, डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालक, डॉ. कादंबरी बलकवडे, तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि राष्ट्रीय आयुष अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद वनस्पती माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या वनस्पतीची माहिती मोबाइलवर उपलब्ध होत होती.

राज्यातील सर्व आरोग्य आणि आयुष संस्था, एकात्मिक आयुष रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष) आणि आयुर्वेद दवाखान्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. आयुर्वेद व्याख्यान, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अंतर्गत आयुष शिबिरे व योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रमाणे राज्यात १० वा आयुर्वेद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Comments (0)
Add Comment