लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
पुणे, १३ : अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून समाजात कायदा व सुव्यवस्थेचे भान राखणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदकाने आज गौरविण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, लैंगिक शोषण, अंमली पदार्थ व्यवहार, पोक्सो आणि फसवणूक यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला असून, अत्याधुनिक तपास पद्धतींचा वापर करत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
या पुरस्कारासाठी राज्यात २०१८ ते २०२२ दरम्यान ५४ अधिकारी पात्र ठरले आहेत. निवडीसाठी राज्यस्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने संकलित केलेल्या २२ शिफारसी केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केल्या होत्या, त्यामधून ११ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक चौबे, डॉ. बसवराज तेली, पल्लवी बर्गे, सौरभ अग्रवाल, पी. आर. पाटील, वैशाली माने यांच्यासह पदक विजेते अधिकारी, त्यांचे कुटुंबीय व पोलीस दलातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले तर विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे यांनी आभार मानले.