लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्यात दीर्घकाळ रक्तरंजित लढ्याचं प्रतीक ठरलेले १२ वरिष्ठ माओवादी कार्यकर्ते अखेर शांततेच्या मार्गावर आले. आज दिनांक ६ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या जहाल माओवादी कॅडरनी आत्मसमर्पण करत नवीन जीवनाची सुरुवात केली. विशेष म्हणजे आत्मसमर्पण केलेल्या यामध्ये ४ डिव्हीसीएम, १ कमांडर, २ उपकमांडर, ४ एसीएम आणि १ सदस्य अशा विविध स्तरांवरील वरिष्ठ माओवादींचा समावेश होता.
सरकारने घोषित केलेल्या बक्षिसाची एकूण रक्कम — १ कोटी १२ लाख..
या सर्व माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण १ कोटी १२ लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये प्रमुख नाव आहे सपनाक्का ऊर्फ स्वप्ना बुचय्या चौधरी हिचं, जिला इंद्रावती दलमच्या प्रभारी म्हणून ओळखलं जात होतं. तिने जवळपास तीन दशकं गनिमी काव्याच्या मार्गाने कारवाया केल्या होत्या. तिच्यावर १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
एके-४७सह आत्मसमर्पण…
प्रथमच माओवादी गणवेशात आणि एके-४७ सारख्या स्वयंचलित शस्त्रांसह दोन माओवादी कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या समोर आत्मसमर्पण करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली. हे दृश्य फक्त आत्मसमर्पणच नव्हतं, तर दहशतीच्या राजकारणावर पडलेली एक निर्णायक मोहर होती.
“माओवाद्यांपासून नागरिकांपर्यंत”: कवंडे येथे जनजागरण आणि आत्मीय संवाद…
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान भामरागड तालुक्यातील अति-संवेदनशील कवंडे पोलिस ठाण्याला भेट दिली. येथे ‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत आयोजित मेळाव्यात त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. १००० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत स्प्रे पंप, शिलाई मशीन, साड्या, चप्पल, सायकली, क्रिकेट किटसारख्या उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “रस्ते, पूल, मोबाईल टॉवर आणि शिक्षणसुविधा – या सर्व माध्यमांतून शासन या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
आत्मसमर्पित माओवाद्यांचे विवाह — पोलिस दल ठरले वधू-वर पक्ष..
गडचिरोली पोलीस मुख्यालयातील ‘शहीद पांडू आलाम सभागृह’ येथे १३ आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्यांच्या सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहात पोलिसच वधू-वरांचे ‘वहाडी’ ठरले. नवविवाहितांना गृहपयोगी वस्तूंचे कीट प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम CSR अंतर्गत ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या सहकार्याने पार पडला.
अभियानात शौर्य गाजवलेल्या जवानांचा सन्मान…
मौजा कवंडे येथे नुकत्याच पार पडलेल्या चकमकीत चार माओवादी ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं होतं. याच अभियानात सहभाग असलेल्या जवानांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांचा विशेष उल्लेखनीय सन्मान करण्यात आला.
याशिवाय, अबुझमाड परिसरातून मे महिन्यात ५ माओवादी अटकेत घेतलेल्या अभियानात सहभागी पथकांनाही सन्मानित करण्यात आलं.
शहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा हात…
दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार जंगल परिसरात चकमकीत शहीद झालेल्या पोशि. महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांना १.१० कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
माओवाद्यांना मुख्यमंत्री यांचे आवाहन: “हिंसा सोडा, सन्मानाचे जीवन जगा”…
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उर्वरित माओवादी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, “लोकशाहीच्या प्रवाहात सामील व्हा, हिंसेचा मार्ग सोडा, आणि शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या.”
पोलीस यंत्रणेचं धाडस आणि प्रशासनाचं सहकार्य…
या संपूर्ण दौऱ्यात राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, DIG अंकित गोयल, व CSR भागीदार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलीस मुख्यालय आणि विविध शाखांतील अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात शांततेच्या बीजांचं रोपण करून पोलिस आणि प्रशासनाने सामाजिक पुनर्बांधणीच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचललं आहे.