रोजगार प्राप्त उमेदवारांना नियुक्त प्रमाणपत्र वाटप व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत नोकरी प्राप्त उमेदवार रवाना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. २८ नोव्हेंबर: गडचिरोली पोलीस दल व एम्स प्रोटेक्शन सर्विस प्रायव्हेट लिमिटेड हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमानाने नोकरी प्राप्त उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पार पडला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशा.), अह्रेरीचे अपर पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे तसेच एम्स प्रोटेक्शन सर्विस प्रायव्हेट लिमिटेड हैद्राबाद चे संचालक महेश यादव यांची उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने रोजगार मेळावा अॅप तयार केला असून या अॅपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी आपली नावं नोंदणी केलेली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागातील १४० बेरोजगार तरुणांना हैद्राबाद येथे सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील तरुणांमध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरलेले असून रोजगार मिळालेल्या १४० तरुणांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली व या उपविभागातील पोस्टेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.