धानोरा तालुक्यातील 200 गावांमध्ये रंगणार 15 दिवस दारूमुक्त युवा क्रीडा स्पर्धा

सर्च आणि युवा मंडळाचा पुढाकार, व्यसनमुक्तीचा नवा संदेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील 200 गावांमध्ये 15 दिवस दारूमुक्त युवा क्रीडा स्पर्धा होणार असून, या उपक्रमाचे आयोजन सर्च संस्था, आदिवासी युवा मंडळ आणि ग्रामसभांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. डॉ. के. व्ही. चारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या 22 वर्षांपासून या तालुक्यात क्रीडा स्पर्धा घेतल्या जात असून, यावर्षीही 5 क्लस्टरमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळ आणि आदिवासींचे अतूट नाते जपणाऱ्या या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, 100 मीटर धावणे यांसारख्या खेळांचा समावेश आहे. यंदा 19 ते 21 डिसेंबर दरम्यान कारवाफा क्लस्टरमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत व्हॉलीबॉल व कबड्डी या स्पर्धांमध्ये 40 संघांनी सहभाग घेतला, तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये 107 युवक-युवती सहभागी झाले.
स्पर्धांचे निकाल
व्हॉलीबॉल स्पर्धेत:
युवक गट: प्रथम क्रमांक – हनपायली, द्वितीय क्रमांक – साखेरा
युवती गट: प्रथम क्रमांक – साखेराटोला, द्वितीय क्रमांक – घोडेझरी
कबड्डी स्पर्धेत:
युवक गट: प्रथम क्रमांक – साखेरा, द्वितीय क्रमांक – कुथेगाव
या क्रीडा स्पर्धेचा उद्देश युवक-युवतींच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेला प्रोत्साहन देणे, त्यांच्यात नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास साधणे, तसेच दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून त्यांना दूर ठेवणे हा आहे. सिताटोला (रांगी क्लस्टर), मॅढा (धानोरा क्लस्टर), पन्नेमारा (मुरुमगाव), आणि चिचोडा (पेंढरी क्लस्टर) या गावांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यसनमुक्तीचा संदेश आणि सांस्कृतिक कार्यक्रम
स्पर्धेदरम्यान ‘मुक्तिपथ’ उपक्रमांतर्गत दारू आणि तंबाखूच्या दुष्परिणामांवर जनजागृती करण्यात आली. गावांना व्यसनमुक्त करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक सुदृढ जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूने किंवा टीमने दारू सेवन केले असल्यास, त्यांना स्पर्धेतून बाद करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. उद्घाटनाच्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 45 महिलांनी सहभाग घेतला.
याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमात विविध 24 टीम्सनी भाग घेतला. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सर्च संस्थेतर्फे बक्षिसे देण्यात आली. या क्रीडा स्पर्धा केवळ खेळांचा आनंद देणाऱ्या नाहीत, तर ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरत आहेत.