‘भारत बंद’ मोर्चात बैलबंड्यांसह शेतकरी सहभागी होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 25 नोव्हेंबर :- केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधीकायद्यांना विरोध करण्याचा निर्धार देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली असून या भारतबंद मध्ये जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि शासकीय – निमशासकीय सेवेतील कर्मचारी संघटनांसह बचतगटांच्या महिला तसेच शेतकरीही आपल्या बैलबंड्यासह सहभागी होणार आहेत.

शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समर्थीत अंगणवाडी सेविका,आशा वर्कर तसेच बचत गटांच्या महिलासुध्दा या मोर्चात सहभागी होणार आहेत. भारतबंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता गांधी चौक येथून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी या मोर्चाचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या विचारसरणीच्या संघटना हा मोर्चा काढून आपआपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. केंद्रसरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वीहोऊ देता कामा नये यासाठी केंद्र सरकार विरोधात २६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत.सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे.

या प्रश्‍नांप्रमाणेच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडून वैनगंगा नदीला आलेल्या कृत्रिम महापूराने झालेले नुकसान अजूनही सरकारकडून भरपाई करून देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचितच राहण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महिला बचत गटाचे कर्ज माफ करुन नव्याने आर्थीक मदत देण्याची गरज आहे. तसेच या काळात आलेले भरमसाठी विज बील पुर्णपणे माफ केलेच पाहिजे.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाॅकडावून काळातील नुकसानीपोटी आर्थिक मदत करण्यात यावी. शासकीय-निमशासकीय सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,मअशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

२६ नोव्हेंबर रोजीच्या मोर्चात मोठ्या संख्येने डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोंदणीकृत बांधकाम कामगार,बचत गटांच्या महिला, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले होते.