नक्षलहिंसेत उद्ध्वस्त कुटुंबांतील नववर्षी २९ तरुणांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १ : नक्षलवादाच्या हिंसाचारामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाला केवळ आश्वासनांच्या चौकटीत न अडकवता प्रत्यक्ष कृतीतून बळ देणारा निर्णय गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतला. नक्षलपीडित कुटुंबातील तरुणांना शासनसेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाअंतर्गत २९ तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य, सुरक्षितता आणि नव्या आशेची पहाट उजाडली आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयानुसार अशा कुटुंबातील एका सदस्याला शासनसेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान रिक्त पदांचा अभाव ही मोठी अडचण ठरत होती. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्वी निरस्त करण्यात आलेली २९ शिपाई संवर्गाची पदे पुनर्जीवित करून घेतली.

या प्रशासकीय संवेदनशीलतेचे आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून १ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबातील २९ उमेदवारांना शासनसेवेत रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, शासनसेवेत मिळालेली ही संधी केवळ रोजगारापुरती मर्यादित नाही, तर समाजाप्रती जबाबदारी स्वीकारण्याची ही मोठी संधी आहे. सेवेत कार्यरत असताना नियमांचे काटेकोर पालन, जनतेप्रती संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच, सेवेत रुजू होताना आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी नवनियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या नियुक्ती वितरण कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, आस्थापना शाखेचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यासह नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

नक्षलवादामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणण्याचा हा निर्णय केवळ प्रशासकीय बाब न राहता, मानवी संवेदना आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Awishant pandaGadchiroli naxal surrenderNaxal get govt job