नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ राज्यपाला सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नाशिक:- शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांनी अभ्यासक्रम निश्चित करून आर्थिक दुर्बल घटकातल्या पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. जगात सध्या अनेक प्रगत देशात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा शोध सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी जपानी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच किंवा अगदी इंग्रजी भाषेतला लघु अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत विद्यापीठांनी विचार कऱण्याचा सल्ला त्यांनी दिला. देशातली शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षावर आधारित पद्धतीवरून परिणामावर आधारित पद्धतीकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्याबरोबरच त्यांना उद्योजकता साधण्यासाठी सक्षम करेल, आणि या युवा पिढीच्या योगदानातूनच २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध विद्या शाखेतल्या सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थांना पदक प्रदान करण्यात आले. तसंच या समारंभामध्ये एकूण १ लाख ३९ हजार २१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कऱण्यात आली. या पदवीधारकांत ६० वर्षावरील १९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ३३ बंदीजनांचा समावेश आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. अशोक कोळस्कर, विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य संजीव सोनवणे, कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड आदी उपस्थित होते.