लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील शौर्यपूर्ण सेवेची दखल घेत महामहिम राष्ट्रपती यांनी जाहीर केलेल्या पोलीस शौर्य पदकांमध्ये गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा मानाचा ठसा उमटविला आहे. यंदा गडचिरोली पोलीस दलातील तब्बल ३१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून, त्यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेचा सन्मान करण्यात आला आहे.
देशपातळीवर यंदा एकूण १२१ पोलीस शौर्य पदके जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचा वाटा लक्षणीय ठरला आहे. विशेष म्हणजे सन २०१८ मध्ये मौजा बोरीया-कसनासूर परिसरात झालेल्या पोलीस-माओवाद्यांच्या भीषण चकमकीत बजावलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीची ही थेट दखल आहे. या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाने ४० माओवाद्यांचा खात्मा करत देशातील नक्षलविरोधी लढ्यात निर्णायक यश मिळविले होते.
या शौर्यपूर्ण कारवाईतील योगदानासाठी पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्यासह उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, हवालदार, नाईक व पोलीस अंमलदार अशा विविध स्तरांवरील एकूण ३१ जणांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत गडचिरोली पोलीस दलास ३ शौर्यचक्र व २१७ पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली असून, हे यश नक्षलविरोधी लढ्यातील दलाच्या सातत्यपूर्ण कार्याची साक्ष देणारे आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना वेगवर्धित पदोन्नती, तर १४ शहीद पोलीस अंमलदारांना मरणोत्तर पदोन्नती देऊन त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यात आला आहे.
याअंतर्गत ८२ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, तर ३०२ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
या गौरवशाली कामगिरीबद्दल पोलीस शौर्य पदक व पदोन्नती प्राप्त सर्व अधिकारी-अंमलदारांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.