लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासी बहुल आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट उडान’ हा उपक्रम राबविला आहे. त्याअंतर्गत १ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्रमांक ८ चे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत जिल्ह्यातील विविध पोस्टे, उपपोस्टे, पोलीस मदत केंद्रे आणि वाचनालयांमधून तब्बल ३७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या सराव परीक्षेचा उपयोग विद्यार्थ्यांना पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी तसेच संयुक्त स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी होणार आहे. जिल्ह्यातील ७१ वाचनालयांमधून एकाचवेळी परीक्षा घेण्यात आली. यात भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. पेनगुंडा, नेलगुंडा आणि कवंडे या ठिकाणच्या पोलीस मदत केंद्रांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावल्याचे विशेष ठरले. केवळ पोलीस मुख्यालयातच १७५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
आतापर्यंत ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आठ टेस्ट सिरीज पार पडल्या असून, तब्बल २७,९५० विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात वाचन संस्कृती वाढीस लागली असून स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.
या सराव परीक्षेला पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचे मनोबल उंचावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाने परीक्षेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मोफत सराव परीक्षा उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.