डिजिटल जनगणना २०२७ साठी गडचिरोलीत ४० प्रशिक्षक सज्ज—अचूकतेवर प्रशासनाचा भर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रशासनाची वाटचाल आता पारंपरिक पद्धतींपासून डिजिटल व्यवस्थेकडे झपाट्याने वळत असल्याचे ठळक उदाहरण म्हणजे आगामी जनगणना-२०२७ कागद विरहित, पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यात तयारीला वेग देण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून ४० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे तीन दिवसीय सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

दिनांक ६ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित या प्रशिक्षणात प्रशासनाच्या तयारीची झलक स्पष्टपणे दिसून आली. जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात सहभागी प्रशिक्षकांना डिजिटल जनगणनेच्या प्रत्येक घटकाची बारकाईने माहिती देण्यात आली.

यंदाची जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून, ती देशाच्या विकास आराखड्याचा पाया ठरणारी माहिती प्रणाली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि वेग या तीनही बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सक्षम बनवण्यासाठी क्षेत्रीय प्रशिक्षकांची भूमिका निर्णायक ठरणार असून, त्यांना प्रशिक्षण देणे ही प्रशासनासाठी प्राथमिकता ठरली आहे.

या प्रशिक्षणादरम्यान डिजिटल उपकरणांचा वापर, डेटा संकलनाची प्रक्रिया, माहिती नोंदविण्याची पद्धत, तसेच संभाव्य अडचणींवर उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जनगणना संचालनालय, मुंबई येथील सहाय्यक संचालक श्री. जोगेंद्र तामगाडगे यांनी तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण करत प्रशिक्षकांना प्रत्यक्ष कामकाजासाठी सज्ज केले. तर नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून आवश्यक बाबी स्पष्ट केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे आणि तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे प्रशिक्षण केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरले.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी क्षेत्रीय प्रशिक्षकांना संबोधित करत जबाबदारीची जाणीव करून दिली. “डिजिटल जनगणना ही केवळ प्रक्रिया नसून ती शासनाच्या भविष्यातील धोरणांची दिशा ठरवणारी प्रणाली आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती अचूक आणि विश्वसनीय असणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तालुकास्तरावर प्रशिक्षण देताना काटेकोरपणा, समन्वय आणि प्रामाणिकपणा यांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम जिल्ह्यात डिजिटल जनगणना राबविणे हे मोठे आव्हान असले, तरी प्रशासनाने त्यासाठी भक्कम पायाभरणी सुरू केली असल्याचे या प्रशिक्षणातून स्पष्ट झाले आहे.

डिजिटल परिवर्तनाचा निर्णायक टप्पा..

जनगणना-2027 ही केवळ एक शासकीय प्रक्रिया न राहता देशाच्या डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गडचिरोलीत प्रशिक्षित झालेले हे ४० क्षेत्रीय प्रशिक्षक आता तालुकास्तरावर ज्ञानाचा प्रसार करत संपूर्ण यंत्रणेला सज्ज करतील.ही तयारी जितकी सक्षम, तितकीच देशाच्या विकासाची दिशा अधिक अचूक ठरणार—आणि याच दृष्टीने गडचिरोली प्रशासनाने उचललेले हे पाऊल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

जनगणना 2026
Comments (0)
Add Comment