लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर, जहाल माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती (सोनू) याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर केंद्रीय समितीने भूपतीला ‘गद्दार’ ठरवून त्याच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत, भूपतीने १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या ५ मिनिटे १७ सेकंदांच्या व्हिडिओ संदेशात सर्व आरोप फेटाळले असून, “आता परिस्थिती बदलली आहे, शस्त्रे सोडून समाजमुखी वाटचाल सुरू करा,” असे आवाहन नक्षल चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना केले आहे.
भूपतीने आपल्या संदेशात स्पष्ट केले की, “१६ सप्टेंबर रोजी शस्त्रबंदीचा विचार मांडला आणि बदलत्या वास्तवाचा स्वीकार करत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. जनतेच्या विकासासाठी आता कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.” केंद्रीय समितीने वापरलेल्या ‘गद्दार’ या शब्दप्रयोगाबद्दल खंत व्यक्त करत, “आमच्यावरचे आरोप निराधार आहेत,” असे तो म्हणाला.
या आत्मसमर्पणानंतर माओवादी चळवळीत सलग पडसाद उमटत आहेत. छत्तीसगडमधील बस्तर येथे रुपेशसह २१० नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली, तर २८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय समितीचा सदस्य पुल्लरीप्रसाद ऊर्फ चंद्रन्ना आणि तेलंगण राज्य समितीचा सदस्य बंडी प्रकाश ऊर्फ प्रभात यांनीही आत्मसमर्पण केले. या घटनांमुळे माओवादी संघटनेच्या शीर्ष नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.
राजकीय आणि सुरक्षा विश्लेषकांच्या मते, भूपतीसारख्या वरिष्ठ नेत्याने आत्मसमर्पणानंतर सार्वजनिक व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडणे ही नक्षल इतिहासातील निर्णायक पायरी आहे. ही फक्त संघटनावरील अंतर्गत फुट नव्हे, तर जंगलातील सशस्त्र चळवळीपासून ‘मुख्य प्रवाहा’कडे वळणाऱ्या नव्या विचारप्रवाहाची सूचक चिन्हे असल्याचे त्यांनी नमूद केले.