नाकाबंदीत ७.७७ लाखांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त; आष्टी पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आष्टी- चंद्रपूर महामार्गावरून असलेल्या फॉरेस्ट नाक्याजवळ आष्टी पोलिसांनी गोंडपिपरीहून येणाऱ्या वाहनावर टाकलेल्या धाडीत तब्बल ७ लाख ७७ हजार ३२५ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व वाहनासह मुद्देमाल जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

१८ जून रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. आष्टी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुगंधित तंबाखू विक्रीसाठी एक व्यक्ती अवैधरित्या येणार असल्याचे कळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी लावून सापळा रचला. यावेळी संशयित मयूर पंढरी पोहनकर (२९, रा. करंजी, गोंडपिपरी) याच्या एमएच ०५ बीएस २२०६ क्रमांकाच्या रेनॉल्ट डस्टर गाडीची झडती घेतली असता, त्यात ईगल हुक्का शिशा तंबाखूच्या ३० प्लास्टिक पिशव्या (किंमत ६०,००० रु.), सिग्नेचर फाईनेस्ट पान मसाल्याच्या १५ पिशव्या (किंमत १७,३२५ रु.) आणि सदर चारचाकी वाहन (मूल्य ७ लाख) असा एकूण ७ लाख ७७ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल सापडला.

आरोपीकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२३, २७४, २७६, २७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस शिपाई संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून झाली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोमनाथ पवार करीत आहेत. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधातील ही ठोस कारवाई म्हणजे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पोलिसांनी दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादने आरोग्यास अतिशय घातक असून अशा प्रकारावर कडक नजर ठेवत कारवाई सुरूच राहील, असा संदेश या यशस्वी कारवाईतून मिळाला आहे.