गडचिरोली जिल्ह्यात 70.60% मतदान; तिन्ही नगरपरिषदांमध्ये शांततेत प्रक्रिया पार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि.३ : नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत गडचिरोली, आरमोरी आणि वडसा (देसाईगंज) नगरपरिषदांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण शांततेत पार पडली. जिल्ह्यात एकूण 70.60 टक्के मतदान नोंदले गेले असून तीनही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आरमोरी नगरपरिषद…

आरमोरीत एकूण 22,999 मतदार नोंदले गेले होते. त्यातील 11,792 पुरुष आणि 11,207 महिला मतदारांपैकी 8,271 पुरुष आणि 8,484 महिला — एकूण 16,755 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदान प्रमाण 72.85 टक्के राहिले.

वडसा (देसाईगंज) नगरपरिषद…

वडसा मतदारसंघात एकूण 26,352 मतदार होते. त्यापैकी 12,763 पुरुष व 13,589 महिला मतदारांमधून 9,449 पुरुष आणि 9,652 महिला — एकूण 19,101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतदानाचे प्रमाण 72.48 टक्के नोंदले गेले.

गडचिरोली नगरपरिषद…

जिल्हा मुख्यालयातील मतदारसंघात एकूण 43,513 मतदारांची नोंद होती, त्यात 21,167 पुरुष, 22,343 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 14,593 पुरुष, 15,107 महिला आणि 2 तृतीयपंथी — एकूण 29,702 मतदारांनी मतदान केले. मतदानाचे प्रमाण 68.26 टक्के राहिले.

जिल्ह्याचा एकत्रित आढावा

रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्र (ईव्हीएम) जमा करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

विशेष म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज (दि.3) ला होणारी मतमोजणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगित केली आहे. नामांकन वैध ठरविण्यावरून आक्षेप आल्याने निवडणूक थांबलेल्या चार सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर एकाचवेळी सर्व ठिकाणची मतमोजणी (दि.21) होईल.

तीनही नगर परिषद क्षेत्रात मतदान करणाऱ्यांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. आरमोरीत 8271 पुरुष आणि 8484 महिलांनी असे एकूण 16 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देसाईगंजमध्ये 9449 पुरुष, तर 9652 महिला मतदार मिळून 19 हजार 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर गडचिरोलीत 14,593 पुरुष आणि 15,107 महिला मतदारांनी, तसेच 2 तृतीयपंथी अशा 29 हजार 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दिव्यांग किंवा म्हातारपणामुळे पायी चालत येऊ न शकणाऱ्यांसाठी व्हिल चेअरची व्यवस्था होती. त्यावरून येत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.

Armori nagarparishad electionGadchiroli nagarparisad electionvotingWadasa nagarparisad election
Comments (0)
Add Comment