वाघासोबत 76 वर्षीय गुराख्याची थरारक झुंज

अलापल्लीच्या हिरव्यागार जंगलात वाघाच्या दहशतीची सावली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

ओमप्रकाश चुनारकर,

वयाच्या पंचाहत्तर ओलांडल्यानंतरही मृत्यूशी दोन हात करणाऱ्या या गुराख्याचे धाडस गडचिरोलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंका नाही. हिरवाईच्या या साक्षीदार सागवानपट्ट्यातील हा थरार केवळ एका गुराख्याचा नाही; तो माणसातील निडरतेचा, जंगलातील भीतीविरहित जगण्याचा आणि धैर्याच्या अनोख्या परंपरेचा प्रेरणादायी दस्तऐवज ठरला आहे…

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वनविभागात अथांग हिरवाईत वयाला हरत न जाणाऱ्या एका गुराख्याने मृत्यूच्या सावटाला हरवून दाखवले. वाघासारख्या हिंस्त्र पशूशी प्रत्यक्ष झुंज देऊन त्याला पळवून लावणाऱ्या ७६ वर्षीय शिवराम गोसाई बामनकर यांच्या अद्भुत धैर्याने संपूर्ण गडचिरोली दणाणून गेली आहे. घनदाट झाडी, सततचा पाऊस आणि सागवानाच्या दाट वनराईसाठी प्रसिद्ध असलेल्या या सिरोंचा वनविभागात पुन्हा एकदा वाघाच्या हालचालींनी ग्रामस्थांच्या मनात भीतीची पाल ठोकली आहे.

बुधवारी सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास खांदला(रा) गावचा रहिवासी शिवराम बामनकर नेहमीप्रमाणे जनावरांना चाऱ्यासाठी चिरेपल्ली गावालगत असलेल्या जंगलात घेऊन गेले होते. पावसाने न्हालेल्या सागवानाच्या जंगलात हिरवीगार गालिच्यासारखी गवताची चादर पसरलेली, पक्ष्यांचे स्वर गूंजणारे वातावरण. परंतु या शांततेला क्षणार्धात हिंस्त्र किंकाळीने छेद दिला. झुडपांतून अचानक वाघाची वीजेसारखी झेप—डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकला तरी शिवराम न डगमगता काठी हातात घेऊन प्रतिकारासाठी उभे राहिले.

सामान्य माणसाचे पाय लटपटले असते अशा प्रसंगी त्यांनी वाघाच्या पंज्यांचा प्रचंड आघात झेलत त्याला झटकून टाकले. काही मिनिटे श्वास रोखून धरणारा हा संघर्ष सुरू राहिला. रक्ताच्या धारा वाहत असतानाही शिवरामांनी न थकता काठीचा आणि जवळ असलेल्या कुऱ्हाडीचा प्रहार करत राहिले आणि अखेर वाघाने मागे वळून जंगलात पसार होणे पसंत केले.

शिवराम यांच्या अंगावर खोल जखमा होत्या. रक्तबंबाळ अवस्थेत ते कसाबसा गावात परतले. ग्रामस्थांनी तत्काळ प्राथमिक उपचार करून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलवले त्यानंतर परिस्थित गंभीर वाटल्याने पुढील अपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. या अद्भुत शौर्यकथेने परिसरातील जनतेचा अभिमान उंचावला असला तरी वाघाला परतून लावल्याची जिद्द हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतो.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आलापल्ली लगत – वेलगुरु रोड परिसरात वाघाने म्हशीचा बळी घेतला होता. आता खांदला गावालगतच्या चिरेपल्ली जंगल परिसरात माणसावर हल्ला झाल्याने भीती अधिकच वाढली आहे. अलापल्ली वनविभाग या परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी जनजागृती करीत असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवराम यांची मुलगी वनिता बामनकर यांनी आलापल्ली वनविभागाकडे तातडीने आर्थिक मदत व उत्तम उपचारांची मागणी केली आहे. गावकऱ्यांनीही शासनाकडे योग्य सन्मान व भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त केली. पावसाळ्यात गजबजलेले हे जंगल, सागवानाच्या दाट झाडीत लपलेल्या वाघाचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांच्या उंबरठ्यावर आलेला धोका—या साऱ्यामुळे अलापल्ली वनविभागात भीतीची कमान अधिकच ताणली गेली आहे.

 

जखमी गुराखी शिवराम बामनकर यांच्या मते हा हल्ला वाघाचा असल्याचा संशय आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान जखमांचे स्वरूप तपासल्यानंतर हा हल्ला अस्वल किंवा रानडुक्कर यांचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या जंगलात पावसामुळे दाट गवत उगवले असून पदमार्गही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे हल्ला करणाऱ्या प्राण्याचा ठोस पुरावा किंवा ठसा मिळू शकलेला नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित परिसरावर वनविभागाचे पथक सतत लक्ष ठेवून आहे. जखमी शिवराम बामनकर यांना उपचारासाठी २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

 गौरेश गडमडे,

वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर

 

 

अलापल्ली वनविभागाच्या हद्दीत वाघांचा सक्रिय वावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नुकतेच अल्लापल्ली–वेलगुरु रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी वाघाने एका म्हशीचा बळी घेतल्याची घटना घडली. त्या ठिकाणी वाघाचे स्पष्ट पगमार्क (पदचिन्हे) आढळून आले असून, वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे जंगल परिसरात न जाणे, जनावरांना उशिरा संध्याकाळी चरण्यास न नेता खबरदारी घेणे अशा सूचना देत वनविभाग जनजागृती मोहीम राबवत आहे.

दीपाली बनकर,

उपवनसंरक्षक, वन विभाग अल्लापल्ली,

Allpali tiger attackMan fight with tigerTiger war with man