– पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
गडचिरोली, दि. 3 फेब्रुवारी: गडचिरोलीजिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व ते आत्मनिर्भर व्हावेत या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलाने ‘रोजगार मेळावा’ हे ॲप तयार केले असून या ॲप च्या माध्यमातून 5 हजार बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्राप्त झाला असून, इच्छुक बेरोजगार युवक युवतींकरिता कौशल्यावर आधारीत विविध प्रशिक्षण सुध्दा राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सदर ॲप मधुन बी.ओ.आय. स्टार आरसेटी गडचिरोली यांच्या मार्फतीने 95 युवक युवतींना ब्युटीपार्लर, कुक्कुटपालन व मत्सपालनचे व्यावसायिक प्रशिक्षण देवुन स्वयंरोजगाराची संधी उपलब्धस करून देण्यात आली आहे.
गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने ब्युटीपार्लर प्रशिक्षणामध्ये 35, मत्स्यपालन प्रशिक्षणामध्ये 25 व कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये 35 अशा एकुण 95 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. हे एक महीण्यांचे प्रशिक्षण 5 जानेवरी 2021 रोजी सुरू होउन व आज 3 फेब्रुवारी 2021 रोजी पुर्ण झाले असल्यामुळे गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने सदर प्रशिक्षणार्थींना निरोप देण्यात आला. सदर कार्यक्रम पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला असून पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी प्रशिक्षणाथ्र्यांना प्रमाणपत्र देवुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मार्गदर्शनपर भाषणात यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असून प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवक युवतींनी स्वतःच्या व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करावे व यशस्वी व्हावे. प्रगत असलेल्या महाराष्ट्रात गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्हयाला विकासाच्या दिशेने घेवुन जाण्यासाठी गडचिरोली पोलिस दल नेहमीच पाठीशी आहे असे सांगितले.
यावेळी अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, आरसेटीचे व्यवस्थापक युवराज टेंभुर्णे, संचालक चेतन वैद्य, प्रशिक्षण समन्यक पुंडलिक काटकर, प्रशिक्षण समन्वयक हेमंत काटकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता आरसेटी बॅंक ऑफ इंडिया तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.