लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १३ : जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना त्यांचे हक्क, सुविधा व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे थेट निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक १६ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद सभागृहात पार पडणार आहे.
या बैठकीत दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, प्रवास व विविध सवलती, सामाजिक सुरक्षा योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, सहाय्यक साधनांची उपलब्धता, शासकीय कार्यालयांतील अपंगसुलभता व इतर सार्वजनिक सुविधांबाबत येणाऱ्या अडचणींवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना अद्याप त्यांच्या अधिकाराचा संपूर्ण लाभ मिळालेला नाही, तर काही ठिकाणी यंत्रणांची उदासीनता, अक्षम्य दिरंगाई आणि गैरसमजामुळे समस्या अधिक बिकट होत आहेत. याच पार्श्वभूमीवर या बैठकीत प्रत्येक तक्रार ऐकून घेतली जाणार असून, स्थानिक प्रशासनासमोर त्यावर तात्काळ उपाययोजना राबविण्याचा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शेखर शेलार यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना, त्यांच्या पालकांना, तसेच जिल्हा परिषद व इतर शासकीय विभागांतील दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना या बैठकीस आपल्या अडचणी, तक्रारी व सूचना घेऊन वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा महत्त्वाचा मंच असून, शासन आणि समाज दोघांची जबाबदारी या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होणार आहे.