लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका होणार सोमवारपासून प्रसारित

– सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २ जानेवारी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध लागलेल्या अस्सल लोककलांचे महत्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका सोमवार दि. ०४ ते सोमवार ११ जानेवारी, २०२१ या कालावधीत रोज संध्याकाळी ७:०० वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या फेसबुक पेज आणि यू टयूब चॅनलवर प्रसारित होईल.

लोककलांचे अभ्यासक डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या,सर्व लोककलांचा थोडक्यात परिचय करून देणाऱ्या प्रस्तावनेने या मालिकेची सुरवात होणार असून यामध्ये सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, शाहीर देवानंद माळी,  लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ.दिलीप डबीर , भारुडकर  निरंजन भाकरे , गोंधळकर  भारत कदम, खडीगम्मत अभ्यासक मनोज उज्जैनकर आणि दशावतार कलाकार सुधीर कलिंगण हे मान्यवर आपापल्या कलेचे मर्म प्रात्यक्षिकासह उलगडणार आहेत.

ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर सर्व कलाकारांशी संवाद साधणार आहेत. कला रसिकांना या संवाद मालिकेचा आपापल्या घरी बसून आस्वाद घेता येईल, तरी संचालनालयाच्या फेसबुक पेज व यूट्यूब वाहिनीवरून या मालिकेचा आनंद घ्यावा,  असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले.

अमित देशमुख